Monday, 9 September 2013

!!! बौद्ध धम्माचे विकृतीकरण – २ !!!



मागील भागात थोडक्यात काही गोष्टी आपण बघितल्यात आता आणखी थोडा आढावा घेवूयात , बुध्दविहारे ,स्तूप ,मुर्त्या ,दर्शनीय स्थळे यांचेही विकृतीकरण मोठ्या प्रमाणावर झालेले आहे . ज्या ठिकाणी भगवान बुद्धाला सम्यक संबोधी प्राप्त झाली त्या ठिकाणी सम्राट अशोकाने महाबोधी विहार स्थापित केले . ब्राह्मणांनी बौद्ध धम्माचा लोप केल्यानंतर या विहाराचे विकृतीकरण केले . अनेक बुद्ध मुर्त्यांचा नाश करून त्या विद्रूप केल्या कुठे शंकराच्या मुर्त्यामध्ये त्याचे रुपांतर केले . या ठिकाणी महाबोधी विहाराची प्रदक्षिणा केल्यानंतर दारापुढे उभे राहून हाताने मागे मूर्तीला दगड मारण्याची पद्धत इथल्या ब्राह्मन्वाद्यानी सुरु केले त्याचा परिणाम बुद्ध मूर्तींचे विद्रुपीकरण झाले . पण जेव्हा अनागरिक देवमित्र धम्मपाल भारतात आले त्यानंतर त्यांनी ही प्रथा बंद करण्यास भाग पाडले . भगवान बुद्धाला सम्यक संबोधी प्राप्त झाल्यानंतर प्रथम धम्मोपदेश तथागताने पाच भिक्खुना केला केला , विहाराच्या बाजूलाच पंचवर्गीय भिक्खुच्या मुर्त्या असताना त्याच ठिकाणी त्यांना पाच पांडव मुर्त्या म्हटलं जात आहे . या महाबोधी विहाराचे प्रबंधन त्या वेळपासून ब्राह्मणी परंपरेच्या हाती आहे ते आजपर्यंत . बंगालच्या शशांक राजाने तेथील बोधीवृक्षाला मुळासकट उपटून टाकले होते . आज जो बोधिवृक्ष तेथे दिसत आहे तो संघमित्रा श्रीलंकेला घेऊन गेली होती त्याची कलम तेथून आणून लावली त्याचा हा वृक्ष आहे आणि तोच हा बोधिवृक्ष आहे . शशांक राजाने त्याचठिकाणी महेश्वराची मूर्ती स्थापन केली त्यामुळे महाबोधी विहारापुढे शिवलिंगाची स्थापना दिसते .

बुद्धगयेजवळ भगवान बुद्धाच्या दोन मुर्त्या आहेत त्यांचही विद्रुपीकरण ब्राह्मणांनी केलेलं आहे एका मूर्तीला ते 'तेल्याबाबा' तर दुसऱ्या 'ढेल्याबाबा' म्हणतात . कारण एका मूर्तीला तेल टाकल्याने तो प्रसन्न होतो त्याला तेल्याबाबा' तर दुसरीला ढेकूळ फेकून मारले कि तो प्रसन्न होतो म्हणून ढेल्याबाबा' अशाप्रकारे बुद्धमुर्त्यांचे विद्रुपीकरण इथल्या मनुवाद्यांनी केलेलं आहे . भगवान बुद्धांनी त्यांच्या महापरीनिर्वाणादरम्यान ' चार दस्सनिय ठानानि ' सांगितले . ते म्हणजे जेथे त्यांचा जन्म झाला ते लुम्बिनी , ज्या ठिकाणी सम्यक संबोधि प्राप्त झाली ते बुद्धगया , जेथे धम्मचक्रप्रवर्तन केले ते सारनाथ व जेथे त्यांचे महापरीनिर्वान झाले ते कुशीनगर , ही चार ठिकाणे सांगितली . याच धर्तीवर त्यांनी ' चारधाम ' निर्माण केले .

जगन्नाथपुरी या ठिकाणी जगन्नाथाचे मंदिर आहे ते हिंदूंचे नसून ते मूळ बुद्धाचे आहे आणि हे एक बुद्धविहारच आहे अजूनही या मंदिरावर धम्मचक्र अंकित आहे . चीनी प्रवासी ह्युअन त्सांग याने या ठिकाणी पाच स्तुपांचा उल्लेख केला आहे . तिरुपती बालाजी हा दुसरा तिसरा कोणी नसून ते एक बौद्धविहारच आहे हे डॉ . जमनादास खोब्रागडे यांनी संशोधन करून प्रसिद्ध केले आहे . रामटेक येथील रामाचे मंदिर देखील रामाचे नसून ते बौद्धविहारच होते याचेही संशोधन सुप्रसिद्ध संशोधक चंद्रनाग नारनवरे यांनीही पुस्तकरूपात प्रकाशित करून सांगितले आहे . रामजन्मभूमी अयोध्याही संपूर्ण बुद्धानगरी होती . राम मंदिराचा वाद सर्वोच्च न्यायालयात सुरु असताना न्यायालयाच्या आदेशानुसार पुरातत्व विभागाने तेथे उत्खनन केले असता तेथे सर्व बुद्धकालीन अवशेष प्राप्त झाले आणि कुठलेच राम मंदिर नाही मिळाले पण इथल्या मनुवादी लोकांनी ह्या गोष्टी दाबून ठेवल्या विशेष म्हणजे आयोध्या शहराचे प्राचीन नाव 'साकेत ' असे होते आणि ती बुद्धनगरी होती . पंढरपूर चे विठ्ठल मंदिर हे बुद्धविहारच होते आणि पांडुरंग हे नाव भगवान बुद्धाचे होते हे डॉ . बाबासाहेबांनी म्हटले होते , या संदर्भात अनेक पुरावेही आज उपलब्ध आहेत . पवनी या ठिकाणी बुद्धकालीन दोन मोठे स्तूप सापडलेले आहेत . सांची पेक्षाही मोठा स्तूप येथे होता .यापैकी एका स्तुपावर जगन्नाथाचे मंदिर बांधलेले आहे . ज्या ज्या ठिकाणी बौद्धलेण्या होत्या त्या त्या ठिकाणी त्यांनी या सगळ्या लेण्यांना पांडवलेण्या म्हटले आहे . कार्ले येथे भगवान बुद्धाची लेणी असताना पण अगदी लेणीच्या लगतच एकविरा देवीची स्थापना करून कोंबड्या बकऱ्यांचा बळी देण्यात येतो हा अतिशय घृणा आणणारा प्रकार इथल्या मनुवाद्यांनी केलेला आहे . बौद्ध धर्मावर हा ब्राह्मणांनी केलेला हल्ला आहे अस मी मानतो. रामटेकच्या नागार्जुन टेकडीवरही गुहेमध्ये नाग बसविलेला आहे . असे अनेक प्रकार अतिशय दुख देणारे आणि मनाला राग आणणारे आहेत .

ज्याप्रमाणे बौद्ध स्थळांचे विकृतीकरण केलेले आहे त्याप्रमाणे बौद्ध परंपरेचेही विकृतीकरण मनुवादी ब्राह्मणी संस्कृतीने केलेले आहे . आषाढी पौर्णिमा या दिवशी सिद्धार्थाने महामायेच्या पोटी प्रतीसंधी (जन्म ) ग्रहण केले . मुलीचे लग्न झाल्यावर आषाढी पौर्णिमेस मुलीला पतीच्या घरी ठेवीत नाहीत , माहेरी घेऊन येतात अथवा दुसरीकडे ठेवतात कारण काय तर 'आषाढी पौर्णिमा तिच्या अंगावरून जाऊ नये ' असे म्हणतात . याला कारण म्हणजे सिद्धार्थ गौतमाने आईच्या पोटात प्रवेश केला होता हा भावार्थ त्यात आहे म्हणून हिंदू ब्राह्मणी मनुवादी परंपरा हि आषाढी पौर्णिमा अशुभ मानते . याच पौर्णिमेच्या दिवशी भगवान बुद्धांनी सर्वप्रथम धम्मचक्र प्रवर्तन करून धम्म प्रकशित केला . भगवान बुद्ध सर्वश्रेष्ठ गुरु आहेत म्हणून हि गुरुपौर्णिमा आहे . परंतु याही पौर्णिमेला ब्राह्मणी परंपरेने बुद्धाच्या ऐवजी व्यास आणि पन्तजलीला गुरु मानून गुरुपौर्णिमा साजरी करतात हे या गुरुपौर्णिमेचही विकृतीकरण केलेलं आढळत . याच पौर्णिमेच्या दिवशी भगवान बुद्धाने प्राणीहिंसेचा निषेध केला ती प्राणीहिंसा आषाढी पौर्णिमेच्या दिवशी देवी ,मातामाय ,मरामाय इ . यांना कोंबड्या ,बकऱ्यांचा बळी देऊन साजरा करतात .

बुद्धधम्माचे होणारे आणि झालेले विकृतीकरण याचे आकलन व्हावे आणि बौद्ध बांधवानी कृतीशील व्हावे यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे . अधिक माहिती आपण पुढील भागात घेवूया .

!!! जयभीम....................नमो बुद्धाय !!!

- प्रवीण जाधव , धम्म उपासक

!!! बौद्ध धम्माचे विकृतीकरण – १ !!!



मनुष्याला सुखाचा ,दु:ख मुक्तीचा , समता , स्वातंत्र्य ,न्याय ,बंधुत्व , शांती , मैत्रीवर आधारित बौद्ध धम्म तथागत भगवान बुद्धाने जगाला दिला पण इथल्या ब्राह्मणी संस्कृतीने स्वार्थाकरिता इतिहासात त्याचा रक्तरंजितपणे ह्रास केला परंतु बाबासाहेबांनी १९५६ ला पुनरुजीवन केले . धम्माचे विकृतीकरण ब्राह्मणी हिंदू संस्कृतीने कस केल त्याचा आढावा आपण घेऊया .

हिंदू पुराण आणि ग्रंथात बुद्धाचे विकृत स्वरुपात वर्णन आढळून येते . जसे आयोध्याकांडामधील श्लोकात रामाने बुद्धाला म्हटले आहे , " यथा ही चोर : स तथा हि बुध्दस्त तथागत नास्तिकमत्र विद्धी !"
अर्थात - जसा चोर तसा बुद्ध तथागत नास्तिक आहे असे रामाने बुद्धाच्या संदर्भात म्हटले आहे . माझा इथे सरळ प्रश्न आहे हिंदुत्ववाद्यांना जर रामायण बुद्धाच्या अगोदर होऊन गेल असेल आणि ५००० वर्षाअगोदर असेल तर बुद्धाविषयी एव्हढी घृणा रामाला का होती ? रामायण म्हणजे दुसर तिसर काही नसून बौद्ध संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृती यांच्यातील संघर्ष आहे . बुद्धाचा नवव्या अवतारामध्ये दाखवून विकृतीकरण केलेलं आहे . नवव्या अवतारानंतर दहावा अवतार विष्णू कशासाठी घेणार आहे ते अनुभागवत पुराणात लिहील आहे . त्यात अस लिहील आहे कि विष्णू जो दहावा अवतार घेणार आहे तो आणि त्याचे आक्रमण किटकामध्ये बौद्धांच्या विरोधात होईल असे म्हटले आहे . बृह्न्नारदीय पुराणात बौद्ध विहारत प्रवेश हा मोठा अपराध समजण्यात आला आहे . बंगालचे स्मृतिकार शूलपाणीने असे घोषित केले आहे कि बौद्धावर नजर पडल्यास मोठे पाप होते . एव्हढ बौद्ध धर्माचे विकृतीकरण केलेले आहे .
कुमारील भट्टाने बौद्ध भिक्खूच्या सहवासात राहून बौद्ध विरोधी कार्य केले . शंकराचार्याने भगवान बुद्धाला 'असंबद्ध प्रलापी ' म्हटले आहे . तसेच मनुष्यांना मूढ करून त्यांना धर्मबाह्य मार्गाने नेण्यासाठी बुद्ध अवतीर्ण झाला असे म्हटले आहे . भिक्षु म्हणून ज्यांना दहा वर्षे झालेली असतात त्यांना 'थेर ' म्हणतात . हे बौद्ध भिक्षुकरिता आपण आदरार्थी संबोधतो . परंतु हिंदू संस्कृतीने तो शब्द बदलवून ' थेरडा ' असे केले आहे . 'थेर ' याच शब्दाला अजून 'धेड ' इथल्या ब्राह्मण संस्कृतीने केले आहे . ब्राह्मण संस्कृतीचे पालन आज बसपा ,बामसेफ सारखे पक्ष अर्थात कांशीराम पासून मायावती , वामन मेश्राम इथल्या बौद्ध लोकांना शिव्या देण्यासाठी 'धेड ' 'गुजरे ' 'भडवे ' 'दलाल ' असे असम्यकपणे वापरून बौद्ध संस्कृतीचा अपमान केलेला आहे . परत 'भिक्खू ' या शब्दाचे विकृतीकरण इथल्या हिंदू संस्कृतीने भिकारी असे केलेले आहे त्याचप्रमाणे भिक्षुणीलाही दहा वर्षे पूर्ण झाली असतील तर आदराने ' थेरी ' असे म्हणतो पण या शब्दाचेही ' थेरडी ' असा विपर्यास केलेला आहे .
सिद्धार्थाला ज्या बोधीवृक्षाखाली म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली सम्यक संबोधि प्राप्त झाली ते झाड म्हणजे बोधीवृक्ष . पण हिंदू संस्कृती असे सांगते कि पिंपळाच्या झाडाखाली कोणी जाऊ नका कारण तेथे 'मुंज्या ' राहतो अस स्वरूप त्यांनी प्रचलित केल . सारनाथ या ठिकाणी भगवान बुद्धांनी प्रथम धम्मोपदेश देऊन धम्मचक्रप्रवर्तन केल , धम्मचक्रप्रवर्तन हे बौद्धांसाठी आदराचे आहे . कृष्णाच्या हाती धम्मचक्राच्या ऐवजी 'सुदर्शनचक्र ' दाखविले आहे . बौद्ध धम्माचे 'निब्बाण ' हे अतिउच्च पद आहे . निर्वांणप्राप्ती हे धम्माचे मुख्य ध्येय आहे . परंतु निब्बाण याचेही विकृतीकरण करून निर्वाण म्हणजे तुमचा अंत आहे .

बुद्ध , धम्म आणि संघ हे बौद्धांचे त्रिशरण आहे आणि तीन हा शब्द बौद्धांसाठी महत्वाचा आहे परंतु ब्राह्मणी हिंदू परंपरेने तीन हा आकडा अशुभ मानला म्हणजेच बुद्ध , धम्म आणि संघ यांना शरण जाणे हे अशुभ आहे . 'तीन तिगाडा काम बिघाडा ' या वाक्प्रचार वापरतात . या तिन्हीना शरण गेले कि तुमचे काम बिघडते असा अर्थ ध्वनित होतो . मृत्युनंतर स्मशानात प्रेताला जाळण्यासाठी लाकडाच्या ढिगाला ठेवतात त्याला 'सरण ' अस म्हणतात . हे सरण कोणते सांगितले हे विचारणीय आहे .
धम्मात आर्य अष्टांगिक मार्ग श्रेष्ठ मार्ग आहेत . आठ हा शब्द हा शब्द अष्टांगिक मार्गाला विकृत करण्यासाठी अशुभ या दृष्टीने इथल्या हिंदू संस्कृतीने उपयोगात आणला . भगवान बुद्धाने उत्तम मंगल काय हे मंगलसुतामध्ये सांगितले आहे . पण ब्राह्मणी परंपरेने 'मंगलसुत्र ' म्हणजे स्त्रियांनी लग्नानंतर आपल्या पतीच्या नावाने घातलेला दागिना बनविले आहे . जयमंगल 'अठ्ठगाथा ' आपले मंगल होवो अशी भावना व्यक्त करण्यासाठी म्हटल्या जातात तिथे हिंदू संस्कृतीमध्ये मंगलाष्टके म्हणतात . हि मंगलाष्टके म्हणजेच जयमंगल अठ्ठगाथेचे केलेले विकृतीकरण आहे .

धम्मबांधवांनी बौद्ध धम्माचा अधिक अभ्यास करून इथल्या ब्राह्मणी हिंदू संस्कृतीच केल जाणार विकृतीकरण थांबवावं मूळ बौद्ध धम्माच पालन करून करून सम्यक संमार्गाने आपले कार्यप्रवण करावे हेच मला नमूद करावे वाटते . पुढील भागात आपण अधिक आढावा घेऊ.

!!! जयभीम ................नमो बुद्धाय !!!
- प्रवीण जाधव , धम्म उपासक

!!! आजच्या अर्थव्यवस्थेला आपणच जबाबदार पंतप्रधान नव्हे !!!



आजच्या २१ व्या शतकात जागतिगीकिकरणाचा जेव्हढा फायदा झाला अर्थात तेव्हढंच इथल्या मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांना नुकसान झाल आहे पण आपणही व्यक्तिगत निर्णय घ्यावा कि जागतिगीकरणात (Globalization ) मध्ये किती राहायचं आणि किती नाही . अर्थात आज रुपयाची किंमत घसरत आहे .डॉलरला ज्यादा भाव आहे ,मी IT क्षेत्रात असल्यामुळे अमेरिकेमधून येणाऱ्या कामाचा IT क्षेत्राला फायदा होईल परंतु इथला माझा तळागाळातील माझा समाज यात भरडला जाईल. जर रुपयाची पत घसरली तर देशांतर्गत किंमती वाढून पेट्रोल ,डीझेल चे भाव वाढून सर्व उत्पादनावर परिणाम होऊन देशात महागाई वाढते म्हणून रुपया कसा मजबूत करता येईल हे आपण बघूया . या आर्थिक स्थितीला जर कोणी पंतप्रधानाला दोष देत असेल तर तो पूर्णता: मूर्खपणा होईल आपल्या सर्वांच्या हातात आहे आपली आणि देशाची आर्थिक बाजू आपण कशी मजबूत करतो ते .

१९७० मध्ये १ $ (डॉलर ) = ४ रुपये होती . आजच्या घडीला डॉलरचा भाव ६७ -६८ रुपयाच्या पार होतांना दिसत आहे . डॉलर हा अधिक मजबूत तर रुपया अधिक कमजोर होत आहे . जागतीगीकरणात सरकारचे हात बांधले असतील कारण त्यात परकीय गुंतुवणूक आहे परंतु आपले हात मोकळे आहेत ,आपण हे बदलवू शकतो ते कसे बघा .

१ ) पेट्रोल ,डीझेल चा काटकसरीने वापर करणे , स्वतःचे पोट भरणारे नायक , चित्रपट निर्माते यावर पैसे उधळू नका .

२ ) थंड शीतपेय ७० - ८० पैशात निर्माण होतात पण आता १५ ते २० रु . ते विकतात असे पेय पिण्याचे टाळा त्याऐवजी निंबू ज्यूस , लस्सी असे देशी पेय प्या .

३ ) साबण - lux,lifebuoy,rexona,liril,dove,pears,hamam,lesancy,camay,palmotive यांच्याऐवजी स्वदेशी cinthol,santoor,medimix, neem असे साबण वापरावे .

४ ) टूथपेस्ट - colgate,close up,pepsodent,cibaca यांच्याऐवजी स्वदेशी Neem, babool, vicco, dabur, promise असे
टूथपेस्ट वापरावे .

५ ) टूथब्रश - colgate, close up, oral-b,pepsodent,forhans यांच्याऐवजी स्वदेशी prudent,ajanta,promise वापरावे .

६ ) शेविंग क्रीम - palmotive,old spice,gillete यांच्याऐवजी स्वदेशी godrej ,emami, vjohn वापरावे .

७ ) ब्लेड - seven-o-clock,365,gillete यांच्याऐवजी स्वदेशी supermax,topaz,laser,ashoka वापरावे .

८ ) टाल्कम पावडर - ponds,old spice,johnson,shower to shower यांच्याऐवजी स्वदेशी santoor,gokul,cinthol,boroplus वापरावे .

९ ) मिल्क पावडर - anikspray,milkana, everyday milk, milkmaid यांच्याऐवजी स्वदेशी indiana,amul,amulya' verka वापरावे अर्थात जे लोक दुधाऐवजी पावडर वापरतात त्यांनी .

१० ) शाम्पू - halo, all clear,nyle sunsilk,head and shoulders, pantene यांच्याऐवजी स्वदेशी Nirma, Velvette इत्यादी वापरावे .

११ ) मोबईल कनेक्शन - vodafone, docomo इ . ऐवजी स्वदेशी bsnl,airtel,reliance वापरावे .

१२ ) बाहेरील जेवण - macdonld, subway, pizza hut, kfc ऐवजी स्थानिक उपहार गृह ,हॉटेल मध्ये जेवावे अर्थात सामान्य लोक macdonld, subway, pizza hut, kfc कडे जात नाही पण मध्यमवर्गीय लोकांनी ते टाळावे .

१३ ) मोबईल फोन - samsung,apple, htc, sony, nokia ऐवजी देशी बनावटीचे फोन अर्थात micromax, karbonn,virgin इ . वापरावे .

१४ ) टु व्हीलर गाडी - honda, yamaha यासारख्या विदेशी गाड्याऐवजी hero, royal enfield सारख्या देशी बनावटीच्या गाड्या घ्याव्या .

१५ ) फुटवेयर - nike, reebok,adidas,converse ऐवजी स्वदेशी bata, chavda इ देशी पायातले चप्पल, बूट इ वापरावे .

१६) जीन्स आणि शर्टस - lee,levi's,U.s. Polo, pepe, benetton ऐवजी स्वदेशी spykar, k-lounge वापरावे .

१७ ) घड्याळ - tommy, Citizen,zodiac,tissot ऐवजी स्वदेशी titan, sonata ,fasttrack अशा घड्याळ वापराव्यात .

असे अनेक उत्पादने आपण स्वदेशी वापरून देशाची आर्थिक पत सुधारून आंतरराष्ट्रीय पातळीवर घसरलेली रुपयाची किंमत परत आणू शकतो . Hindustan Liver किंवा Uniliver यांचीही उत्पादने टाळावीत कारण याही परकीय कंपन्या आहेत . हा दोष पंतप्रधान किवा सरकारचा नाहीये तो दोष आपला आहे . स्वतःमध्ये अनेक गोष्टी तपासून पहा आणि देशाचा स्वाभिमान परत मिळवा .

!!! जय भीम .............. नमो बुद्धाय !!!

- प्रवीण जाधव ,संचालक, एपीएस इन्फोटेक,पुणे 

Tuesday, 27 August 2013

               !!!!! कर्मवीर दादासाहेब गायकवाड !!!!!
डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी सुरु केलेल्या मानवमुक्तीच्या संग्रामाला सन १९२७ ला महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या रूपाने रणशिंग फुंकले . त्या रणसंग्रामात जर कोणी महत्वाचे योगदान दिले असेल तर आदरणीय भाऊराव कृष्णराव गायकवाड हे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल . भाऊराव कृष्णराव गायकवाड हे अंधश्रद्धाळू सैनिक नव्हते तर ते डोळस होते ,ते प्रगाढ पंडित नव्हते तर आपल्या अभ्यासू वृत्तीने पंडितालाही लाजवेल असे ज्ञान संपादन केले होते . तळागाळातील लोकांसाठी बाबासाहेबांनी सुरु केलेल्या लढ्याला ज्या निष्ठावान सैनिकाने पेलली होती आणि आपल्या कर्तुत्वाने आंबेडकरी चळवळ खांद्यावर घेतली आणि बाबासाहेबांच्या महापरीनिर्वाणानंतर चळवळीचे नेतृत्व केले ते भाऊराव कृष्णराव गायकवाड  म्हणजेच समाजाचे "कर्मवीर" दादासाहेब गायकवाड झालेत .

                            दादासाहेबांच्या रूपाने अन्याय , अत्याचार ,जुलुमाविरुद्ध लढण्यासाठी भीमआवाज उठविण्यात आला . जेथे अन्याय झाला तेथे दादासाहेब उभे ठाकणारच त्यांनी थंडी ,वारा ,ऊन पाऊस ,भूक तहान ,नदी नाला आदींची पर्वा केलीच नाही . कोणत्याही अन्यायी गोष्टीचा छडा लावल्याशिवाय ते परतत नसत . ते काम घरचेच आहे अशा जिद्दीने ते काम करीत असत म्हणूनच ते लोकप्रिय झाले होते त्यांच्याबद्दल नितांत आदर ,आपुलकी ,जिव्हाळा ,प्रेम लोकांना वाटत असे . कर्मवीर दादासाहेबांच्या कार्याला गती मिळाली १९३० ते १९३५ अशी वर्षे चालणाऱ्या काळाराम मंदिर सत्याग्रह रूपाने  'चलो काळाराम मंदिर ' या घोषणेने त्यावेळची सिंहस्त पर्वणी ,दरवर्षीची राम नवमी दणाणून सोडली , त्या सत्याग्रह समितीचे दादासाहेब सेक्रेटरी होते . घरच खाऊन ,प्रसंगी उपाशी राहून हा सत्याग्रह इतक्या नेकीने आणि जिद्दीने दादासाहेबांनी आयोजित केला होता कि गोविंदराव देशपांडे , ,का .पाटील यांच्यासारख्यांनी दादासाहेबांचे कौतुक केले तर सावरकर ,डॉ मुंजे यांच्यासारख्या कर्मठ हिंदुत्ववाडी नेत्यांनी मंदिर प्रशासनाला पत्र पाठवून अस्पृश्यासाठी दरवाजे खुले करावे पण याचा काही उपयोग झाला नाही उलट तीन चार वेळा अस्पृश्यांना मार खावा लागला  अगदी खोल जखमा होईपर्यंत हल्ले झाले यात दादासाहेबांना तुरुंगवास भोगावा लागला .

१९३७ च्या मुंबई प्रांतिक कायदेमंडळावर दादासाहेब निवडून गेले आणि त्यातच त्यांचे कार्यक्षेत्र वाढतच गेले . नाशिक सार्वजनिक वाचनालय ,नगरपालिका ,नाशिक जिल्हा लोकल बोर्ड आणि मुंबई कायदेमंडळ अशी कक्षा विस्तारत गेली . खेडोपाडी जाऊन मागाससमाजासाठी विहिरी खुल्या व्हाव्यात ,वतने रद्द करावीत ,राखीव मतदार संघ असावे ,मागास शिक्षित तरुणांना नोकरीमध्ये योग्य ते प्रतिनिधित्व मिळावे अशा कितीतरी सुधारणेसाठी आपले पाय झिजवले ,अत्यंत साधी राहणी ,धोतर ,सदरा आणि निळी टोपी ने सर्व आंबेडकरी जनतेवर छाप पाडली . स्वाभिमानी भीमबाण्याने ते कधी कुणापुढे लाचार झाले नाहीत म्हणून कु . शांताबाई दानी , रा . सु . गवई ,रोहम आदी तरुण कार्यकर्ते त्यांच्याशी निष्ठेने आणि तळमळीने वागले . केवळ राजकारण हे त्यांच्या जीवनाचे सूत्र नव्हते तर समाजकारण आणि सुधारणा यावर त्यांचा भर होता म्हणून मनमाड ,नाशिक ,नाशिक रोड अशा अनेक ठिकाणी त्यांनी वसतिगृहे आणि माध्यमिक शाळा सुरु केल्या एव्हढेच नाही तर नाशिकला ' रमाबाई आंबेडकर वसतिगृह ' स्त्रियासाठी सुरु केल

बाबासाहेब दादासाहेबांचे कौतुक करताना म्हणत " हा माझा भाऊराव गायकवाड , माझ्या कसोटीवर शंभर नंबरी सोन्यासारखा उतरला आहे . हे सोने अतिशय शुद्ध आहे सर्व प्रकारच्या आगीतून ते तावून सुलाखून तसेच्या तसे शुद्ध राहिले आहे , तेव्हा तुमचा खरा नेता हाच आहे , हा माझा उजवा हात आहे . त्याने सार्वजनिक कार्य .तुमची उन्नती हेच त्याने स्वताच्या जीवनाचे ध्येय मानले आहे ,त्याला अन्य जीवन नाही . "
               भारताला १९४७ ला स्वातंत्र्य मिळाल पण भारताची दोन शकले झाली त्यात एक पाकिस्तान , त्या पाकिस्तानात हिंदू स्त्रियांची बेअब्रू ,विटंबना होत होती त्याला तोंड देण्यासाठी भारत सरकारने एक अधिकारी म्हणून दादासाहेबांची निवड केली . ते कराचीला गेले तिथे त्यांनी निर्भीडपणे आणि निधड्या छातीने काम केले आणि हिंदू स्त्रियांची सुटका केली म्हणूनच सरकारने त्यांना ' पद्मश्री ' हा किताब देऊन सन्मान केला . नागपूर मुक्कामी डॉ . बाबासाहेबांनी १४ ऑक्टोबर १९५६ ला बौद्ध धर्माची दीक्षा घेतली त्यातही तितकाच दादासाहेबांचा सहभाग होता . पण  डिसेंबर ला बाबासाहेबांचे महपरिनिर्वाण झाले समाज पोरका झाला दादासाहेब जर नसते तर समाजाचे सांत्वन होऊ शकले नसते . समाजकार्यासाठी ,धम्मकार्यासाठी दादासाहेबांनी जीवाच रान केल आपल शरीर चंदनाप्रमाणे झिजविले असा पोलादी पुरुष बाबासाहेबानंतर समाजाला लाभला हे हे समाजाच महाभाग्यच म्हणावे लागेल आज आपण बाबासाहेबांनी केलेल्या उपकाराने आणि आणि दादासाहेबांच्या पुण्याईने उभे आहोत ते केवळ सामाजिक परिवर्तनामुळे होऊ शकल आज बाबासाहेबांच्या रांगेत कोणा ' मसीहा ' ला कोणी बसवत असतील पण दादासाहेबांच समाज घडविण्याच कार्य हे कोण्या मसीहापेक्षा लाखपतीने आणि प्रामाणिकतेणे आहे त्याची सर इतर मासिहाशी होणार नाही .

बाबासाहेबांच्या ' रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ' ह्या पक्षाची कागदावरची रूपरेषा प्रत्यक्षात कर्मवीर दादासाहेबांनी आणली पक्ष अखिल भारतीय पातळीवर आणण्यात दादासाहेबांचा मोलाचा वाटा होता . ६० आणि ७० च्या दशकात पक्षाने महाराष्ट्रातच नव्हे तर पंजाब , उत्तर प्रदेश ,मध्यप्रदेश ,बिहार अशा अनेक ठिकाणी विधिमंडळावर आणि संसदेत आपले प्रतिनिधी पाठवले एव्हढेच नव्हे तर  पंजाब , उत्तर प्रदेश ,हरियाना मध्ये रिपब्लिकन पक्ष सत्तेचा वाटेकरी होता आणि हत्ती हे मूळ चिन्ह रिपब्लिकन पक्षाचे होते बाबासाहेबांचा हत्ती हि ओळख त्याकाळी होती म्हणून नंतर आयत्या बिळावर येणाऱ्यानी हे म्हणू नये कि तिथे सत्ता आम्ही निर्माण केली तिची पाळेमुळे अगोदरच रिपब्लिकन पक्षाने निर्माण केली होती . पुढे दादासाहेबांच्या आजारपणाचा कॉंग्रेस ने फायदा घेऊन त्यांच्या सहकारी असलेले मोर्य , गवई . कॉंग्रेस, बीजेपी  ने फोडून सत्तेचे तुकडे फेकून आंबेडकरी चळवळ नेस्तनाबूत करण्याचे काम केले . पण सामाजिक क्रांतीची जी पाळेमुळे आंबेडकरी समाजावर असल्यामुळे इथल्या जातीयवाद्यांशी लढण्यास बळ दिले . हे दादासाहेबांच्या पुण्याईचे फलित म्हणावे लागेल .

कर्मवीर दादासाहेबांच कार्य इतक मोठ आहे कि ते लिहिण्यासही अपूर्ण पुरते . संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत कोणी अत्रे , जोशी , यशवंतराव चव्हाण ,अण्णा डांगे यांचे नाव इथला मिडिया घेत असला तरी यांच्याहून अधिक कार्य कर्मवीर दादासाहेबांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी केलेलं आहे याचीच पावती म्हणून बाबासाहेबांच्याप्रमाणे जिवंतपणीच नाशिक नगरपालिकेने बसविला . दादासाहेबांनी १९६४ चा अखिलभारतीय भूमिहीनांचा लढा लढविला त्या सत्याग्रहात ,५०,००० लोक तुरुंगात डांबले गेले ,इथे मला  अभिमानाने सांगावेसे वाटते कि दादासाहेबांच्या या लढ्यात त्यांच्यासोबत माझ्या आजोबांनीही त्याकाळी ३० दिवस तुरुंगवास भोगला . इतकी हि प्रचंड चळवळ पाहून त्यावेळचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री देखील चकित झाले आणि म्हणाले," भूमिहीनांची हि चळवळ रास्त चळवळ आहे आणि त्यांच्या मागण्याही रास्त आहेत ,देशाने त्यांना दिल्या पाहिजे " . अर्थात याचे सर्व श्रेय कर्मवीर ,पद्मश्री आदरणीय दादासाहेब गायकवाड यांना जाते .

     अखेर २९ डिसेंबर १९७१ ला दादासाहेबावर काळाने झडप घातली ,एक उत्कृष्ट वक्ता ,संसदपटू ,देशभक्त ,समाजकारणी त्याहीपेक्षा बाबासाहेबांच्या नंतर आंबेडकरी चळवळीचे नेतृत्व त्यांनी केले . आजच्या सुखवस्तूत जगणारा जो आंबेडकरी समाज आहे त्याने आंबेडकरी चळवळ आणि रिपब्लिकन चळवळीशी प्रामाणिक राहून बाबासाहेबांच्या विचाराना आणि कृतीला जीवाचे रान करणाऱ्या कर्मवीर दादासाहेबांच्या कार्याला जागे राहून हा चळवळीचा गाडा पुढे न्यावा खऱ्या आंबेडकरी विचाराशी आणि रक्ताशी एकरूप राहून स्वाभिमानी असल्याचे दाखवून देऊन चळवळीचा हा अनमोल ठेवा जपावा हीच माफक अपेक्षा आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाड  या महान नेत्याला माझ्या लेखणीने वाहिलेली आदरांजली……………… जयभीम


                                                                         - प्रवीण जाधव