Saturday, 29 August 2015



!!! जाती श्रेष्टत्वाचा नाद कशासाठी ......? !!!

गेल्या अनेक दिवसापासून सदर खालील पोष्ट सोशल मिडियावर फिरत आहे ,यामधील अज्ञानीपणा आणि खोडसाळपणा पाहून मला यावर सविस्तर लिहावे वाटले म्हणून मी सदर पोस्ट आणि त्यावर स्पष्टीकरण देत आहे .
“बाबासाहेब आंबेडकर आणि मराठा समाज यांचे जिव्हाळ्याचे नाते **त्यातील काही निवडक गोष्टी.....
1:-महाडच्या चवदार तळ्याच्या सत्यागृहावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडावर जावून
शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यानी "जय
शिवरायच्या" घोषणा दिल्या. बाबासाहेबांनी महाड चवदार तळ्याच्या सत्यागृहाची सुरुवात
शिवरायांचे दर्शन घेवून केली.
2:- बेळगाव येथे शिवरायांच्या ३०० व्या जन्मशताब्दीनिमित्त प्रमुख पाहूने
म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर उपस्थितहोते.
3:- बाबासाहेब आंबेडकर पत्र लिहतांना पत्राची सुरुवात
"जय शिवराय" लिहून करत होते. महाराष्ट्र शासनाने हि पत्रे प्रकाशित केलेली आहेत.
4:- ज्या मनुस्मृती या विषमतावादी ग्रंथामुळे शिवरायांचा राज्याभिषेकब्राम्हणांनी नाकारला होता.
तो मनुस्मृती हा ग्रंथ बाबासाहेबांनी रायगडाच्या पायथ्याशी जाळून शिवरायांच्या अपमानाचा बदला घेतला.
5:- बाबासाहेब म्हणतात संविधान लिहते वेळी मला जास्त ञास झाला नाही कारण छञपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य माझ्या डोळ्यासमोर होते.म्हणूनच मी संविधान लिहु शकलो
6:- बाबासाहेब आंबेडकर लहान असतांना "कृष्णराव. अर्जुन केळुस्कर" गुरुजींनी त्यांना "बुद्ध चरित्र"
भेट दिले होते. या चरित्रामुळे बाबासाहेबांना धर्मांतराची प्रेरणा मिळाली. केळुस्कर गुरुजी जन्माने"मराठा" होते.
7:-छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकर "बैरीस्टर" झाल्यावर, त्यांची कोल्हापूर शहरात रथातून मिरवणूक काढून फुले उधळली होती.
8:-राजा सयाजीराव गायकवाड यांनी बाबासाहेबांना परदेशात शिक्षणासाठी सहाय्य केले होते.
सयाजीराव गायकवाड जन्माने मराठा होते.....
9:- बाबासाहेब आंबेडकरांनी शिका आणि संघटीत व्हा हा संदेश मराठा बहुजनांना दिला.
"चांभार घराण्यात जन्माला आलेला नेपोलीयन बोनापार्ट अर्ध्या युरोप खंडाचा बादशाह झाला. अरे
ज्याच्या आई बापाचा पत्ता नाही तो रेंसमन हेरॉलड ब्रीटन चा पंतप्रधान झाला. लाहनपणी कोळशाच्या खाणीत काम करणारा अब्राहम लिंकन अमेरीकेचा राषट्राध्यक्ष झाला अरे पण मानुसकी नाकारलेल्या समाजात जन्मलेला आपला " भिमराव " या देशाचा शिल्पकार झाला..........! “

अशी ही वरील पोष्ट असून मुद्दामपणे शिवाजीमहाराज ,बाबासाहेब आंबेडकर मराठा समाज ह्या गोष्टी घुसडवण्याचा प्रयत्न कुठलीही अभ्यास नसलेली व्यक्तीच करू शकते .मी सर्वप्रथम शिवाजी महाराज महाराष्ट्रातील बहुजन लोकांना एकत्र आणून स्वराज्य निर्मिती आणि स्वकीय आणि परकीय आक्रमण असून पण विजय मिळवून स्वराज्य स्थापण केले अशा महान राजाचा मी प्रचंड आदर आणि सन्मान करतो परंतु प्रत्येक महापुरुषाची स्वतःची ओळख वेगळीच असते त्या त्या काळाची परिस्थिती त्यातील बदल त्या काळानुरूप महापुरुषाकडून होतात .शिवरायांनी मावळ्यांना एकत्र करून राजकीय बदल केला परंतु त्यांना धार्मिकतेचा डोंब ब्राह्मणी परंपरा असल्याने सामाजिक बदल ते करू शकले नाहीत हे एक सत्य आहे .

“1:- महाडच्या चवदार तळ्याच्या सत्यागृहावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडावर जावून शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यानी "जय शिवरायच्या" घोषणा दिल्या. बाबासाहेबांनी महाड चवदार तळ्याच्या सत्यागृहाची सुरुवात शिवरायांचे दर्शन घेवून केली.”

- --> सदर पहिला मुद्दा पोष्ट करणाऱ्याने टाकलेला आहे .यात सत्याग्रहाची सुरुवात शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेऊन केली हे म्हणणे अगदी अज्ञानी वृत्तीने आणि कुठलीही माहिती न घेता केलेले आहे .महाडचा ऐतिहासिक चवदार तळ्याचा सत्याग्रह २० मार्च १९२७ ला झाला .अनेक इतिहासाची पाने चाळली अनेक खंड जरी चाळून बघितले तरी बाबासाहेब चवदार तळ्याच्या सात्याग्रहापुर्वी रायगडावर गेलेच नव्हते त्यामुळे रायगडावर जाऊन दर्शन घेऊन सत्याग्रहाची सुरुवात केली हे चुकीचे आहे .बाबासाहेब रायगड किल्ला बघण्यासाठी आपल्या अनेक लोकांसोबत २९ डिसेंबर १९२७ ला गेले होते तेंव्हा रात्री आपल्या अनुयायासोबत मुक्काम केला असता ,बाबासाहेब आंबेडकर यांचावर प्राणघातक हल्ला करण्यासाठी ५० ते ६० मराठा लोक बंदुकी ,हत्यारे घेऊन गडाच्या दिशेने निघाल्याची बातमी महार कार्यकर्त्यांना कळाली तेंव्हा रात्री गडाच्या पायथ्याशी बाबासाहेबांचे अनुयायी मोठ्या प्रमाणावर जमल्यामुळे मराठा समाजातील हल्लेखोर तिथे भीतीने येउच शकले नाही .( संदर्भ – भीमराव रामजी आंबेडकर खंड ३ ,ले .चांगदेव भगवानराव खैरमोडे , पा.नं .२१३ ). उलट हा प्रकार होऊन केसरी या वृत्तपत्राने तत्कालीन आमदार नारायण गुंजाळ यांचे बाबासाहेबांच्या वरील आक्षेपार्ह्य भाषण छापून आंबेडकर यांनी शिवाजीच्या सिंहांसणावर बसून सिंहासन भ्रष्ट केले .त्यावर बाबासाहेबांनी नारायण गुंजाळ आणि केसरी चे संपादक नरसोपंत केळकर यांना नोटीस पाठवली .त्याही नंतर “कुलाबा समाचार “ या वृत्तपत्राने “डॉ .आंबेडकरांच्या रायगडावरील लीला “ असे हेडिंग देऊन आगपाखड केली .यानंतर रा .चित्रे ,सहस्त्रबुद्धे या सारख्या ब्राह्मणमंडळींनी बाबासाहेबांच्या आंदोलनाची पार्श्वभूमी मराठा समाजाला समजवण्यासाठी व्याख्याने दिली .

“2:- बेळगाव येथे शिवरायांच्या ३०० व्या जन्मशताब्दीनिमित्त प्रमुख पाहूने
म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर उपस्थितहोते.”

---> माझ्या माहितीप्रमाणे अस कुठलही व्याख्यान बाबासाहेबांनी दिलेलं नाही जर असेल त्याचा संदर्भ द्यावा .

“3:- बाबासाहेब आंबेडकर पत्र लिहतांना पत्राची सुरुवात
"जय शिवराय" लिहून करत होते. महाराष्ट्र शासनाने हि पत्रे प्रकाशित केलेली आहेत.”

---> महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या या खंडात एकूण २३६पत्रे आहेत.या ग्रंथाची एकुण पृष्ठ संख्या ४३४ आहे. त्यातल्या नेमक्या कोणत्या पत्राची सुरूवात बाबासाहेबांनी "जय शिवराय" लिहून केलीय हे समजून घ्यायला मला आवडेल.निदान या खंडात तरी असे एकही पत्र नाही. मी बाबासाहेंबांची इतरही प्रकाशित / अप्रकाशित पत्रे पाहिलेली व वाचलेली आहेत. माझ्या पाहण्यात तरी असे कोणतेही पत्र आलेले नाही. हे खुद्द महाराष्ट्र शासनाच्या “डॉ .बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे” प्रसिध्द करणाऱ्या प्रा .हरी नरके यांच मत आहे त्यामुळे बाबासाहेबांना कनिष्ठ दाखविण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे .दोन्ही महापुरुष आपापल्या योग्य ठिकाणी आहेत पण वर्णव्यवस्थेत शुद्र ठरलेल्या जातीसाठी हा प्रकार करणे अगदी चुकीचा आहे .

“4:- ज्या मनुस्मृती या विषमतावादी ग्रंथामुळे शिवरायांचा राज्याभिषेक ब्राम्हणांनी नाकारला होता.तो मनुस्मृती हा ग्रंथ बाबासाहेबांनी रायगडाच्या पायथ्याशी जाळून शिवरायांच्या अपमानाचा बदला घेतला.”

- --> वरील मुद्दाही अगदी हास्यास्पद आहे . शिवरायांच स्वराज्य ,बहुजन मावळ्यांना सोबत घेऊन मिळविलेल स्वराज्य राजकीयदृष्ट्या अगदी सत्य आणि आदरणीय असल तरी त्याकाळी धार्मिक सत्ता जे ठरवील वैदिक परंपरा जे सांगेल तेच केल्याशिवाय त्याला मान्यता नव्हती . याबद्दल खुद्द डॉ .बाबासाहेब आंबेडकर आपल्या Who were Shudras? अर्थात शुद्र पूर्वी कोण होते ? या ग्रंथात पान.क्र. १९५ वर लिहितात कि “ शिवाजी एका स्वतंत्र राज्याचा राज्यकर्ता होता व त्यानी स्वत :ला महाराजा व छत्रपती हे खिताब घेतलेले होते .त्याच्या प्रजेपैकी बरेचसे ब्राम्हण होते .अशी परिस्थिती होती तरीसुद्धा आपला राज्याभिषेक विधी करवून घेण्याच्या बाबतीत शिवाजीला एकाही ब्राम्हणावर सत्ता गाजविता आली नाही .राज्यभिषेकाचा विधी जर कायदेशीर ठरवायचा असेल तर तो ब्राम्हणाच्या हातून झाला पाहिजे ही गोष्ट शिवाजीच्या उदाहरणावरून स्पष्ट झालेली आहे ,म्हणून ते उदाहरण महत्वाचे आहे .राज्याभिषेकाचा विधी जर ब्राम्हणेतराच्या हातून करण्यात आला तर तो विधी सफल होत नसतो .म्हणजे तो वांझ ठरतो .” यावरून ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांना चातुर्वर्ण वैदिक परंपरेत मनुस्मृती नुसार शुद्र ठरविले होते परंतु शिवाजी महाराजांनी काशीच्या गागा भट ला अमाप संपत्ती देऊन हा विधी घडवून आणला होता एकंदरीत ब्राह्मणी व्यवस्था तोडण्याऐवजी शिवाजी महाराजांनी त्याच व्यवस्थेत राहून त्याच पालन राज्याभिषेकासाठी करणे उचित मानले होते त्यासाठी होणारा विरोध असून पण त्या वर्णव्यवस्थेच्या बेड्या तोडण्याऐवजी त्यात राहणेच उचित समजले होते .हे ही ऐतिहासिक सत्य आहे त्यामुळे वरील मुद्द्यातील राज्यभिषेक आणि मनुस्मृती दहन याचा कसलाच सबंध नव्हता .मनुस्मृती मधील अमानवीय गोष्टीना विरोध म्हणून मनुस्मृतीने दहन केले होते .

“5:- बाबासाहेब म्हणतात संविधान लिहते वेळी मला जास्त ञास झाला नाही कारण छञपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य माझ्या डोळ्यासमोर होते.म्हणूनच मी संविधान लिहु शकलो.”

- --> वरील मुद्दाही अगदी हास्यास्पद आणि खोडसाळपणाचा आहे . डॉ .बाबासाहेबांनी भारताचे संविधान लिहिताना अत्यंत कष्ट घेतले होते प्रचंड अभ्यास केला होता .५२ देशांच्या घटनांचा अभ्यास तसेच बाबासाहेबांच्या लिखाणात वाचनात बुद्धकालीन इतिहास होता त्यामुळे बुद्धकालीन गणराज्य पद्धती जी लोकशाही मार्गाने निर्णय घेत असत त्यात अनेक गणराज्य होती लीच्छ्वी सारखी गणराज्ये होती जी लोकशाही पद्धतीने राज्य करीत होती .तसेच भगवान बुद्धाच्या समता ,स्वातंत्र्य ,बंधुत्व ,न्याय या तत्वांचा अंतर्भाव राज्यघटनेत बाबासाहेबांनी केलेला होता . त्यामुळे शिवाजी महाराजांचे स्वराज्य होते म्हणून संविधान लिहू शकलो ही वाक्ये टाकणे म्हणजे हा मूर्खपणा आणि खोडसाळपणा आहे असे मी समजतो यात शिवाजी महाराजांचा विरोध आजीबात नाहीच पण अशा पोष्ट प्रसारित करणाऱ्या मूर्ख लोकांच्या अडाणीपणाची कीव वाटते . शिवाजी महाराजांचं स्वराज्य राजकीयदृष्ट्या सत्य जरी असलं तरी धार्मिक ,सामाजिक ,शैक्षणिक दृष्ट्या अस्पृश्य ,शुद्रातीशुद्र लोकांना जातीयव्यवस्थेच्या पायथ्याशीच राहावे लागत होते . निवडक प्रतिनिधित्व किल्लेदार ,जहागीरदार महार ,अस्पृश्य लोक जरी असले तरी त्यांच प्रमाण प्रातिनिधिक स्वरुपात होत . शिवाजी महाराजांना राजकीयदृष्ट्या अधिकार जरी असले तरी सामाजिक ,धार्मिक ,शैक्षणिक बदल करण्याचा अधिकार नव्हता . अस्पृश्य महार लोक निवडक किल्लेदार ,जहागीरदार जरी असले तरी त्यांना अष्टप्रधानमंडळात कुठे स्थान होत ? अष्टप्रधानात असलेली मंत्रीमंडळात मोरोपंत त्रिंबक पिंगळे , रामचंद्र निलकंठ, अण्णाजीपंत दत्तो, दत्ताजीपंत त्रिंबक, हंबीरराव मोहिते, रामचंद्र त्रिंबक, निराजीपंत रावजी, रघुनाथराव पंडीत या सारख्या मंडळीमध्ये अस्पृश्य शुद्रांतीशुद्र वर्ग कुठे होता ? आजची पडका सिंहगड किल्ला निरखून पहिला असता “महार टाके” ,”मराठा टाके” असे पिण्याचे पाण्याचे हौद त्याकाळी वेगवेगळ्या स्वरुपात होते त्यामुळे शिवाशिव ,बाट ,अस्पृश्यता त्याकाळी होतीच एक राजा म्हणून एक आदेश जर शिवरायांनी दिला असता तर एका आदेशाने अस्पृश्यता जातीयता नष्ट होऊन समानता निर्माण झाली असती तिथे खरच स्वराज्य समानतेवर असत तर तिथे बाबासाहेबांना हालापेष्टा सहन कराव्या लागल्या नसत्या ,तिथे खरच स्वराज्य समोर असत तर संविधान लिहिण्याची गरजही पडली नसती .

“6:- बाबासाहेब आंबेडकर लहान असतांना "कृष्णराव. अर्जुन केळुस्कर" गुरुजींनी त्यांना "बुद्ध चरित्र"
भेट दिले होते. या चरित्रामुळे बाबासाहेबांना धर्मांतराची प्रेरणा मिळाली. केळुस्कर गुरुजी जन्माने"मराठा" होते.”

---> हे जरी खर असलं केळुस्कर गुरुजींनी शालेय जीवनात बाबासाहेबांना सदैव प्रेरणा दिली पण त्यांची जात मराठा होती म्हणून जातीसाठी अशा पोष्ट्द्वारे गवगवा करणे योग्य वाटत नाही . बाबासाहेबांनी पुढे चालून प्रत्येक धर्माचा अभ्यास केला बौद्ध धर्माची निवड केली त्यामुळे मराठा जातीमुळे केळुस्कर श्रेष्ठ ठरले आणि त्यांनी बुद्धचरित्र भेट दिल म्हणून बाबासाहेबांना धर्मांतर करण्याची प्रेरणा मिळाली असे म्हणणे म्हणजे बौद्धिक दिवाळखोरी होय .अस असेल तर केळुस्कर गुरुजींनी अगोदरच बौद्ध धर्म स्वीकारला नसता का ?

“7:-छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकर "बैरीस्टर" झाल्यावर, त्यांची कोल्हापूर शहरात रथातून मिरवणूक काढून फुले उधळली होती.”

---> अगदी बरोबर शाहू महाराजांनी जे बाबासाहेबांना जातीच्या बाहेर जाऊन हेरल होत ते सवर्ण जातीत अडकणारे जातीचाच विचार करू शकतात त्याही काळात शाहू महाराज अस्पृश्यांसाठी सामाजिक बदल करीत होते तेंव्हा आता जे त्यांना जातीत गोठवण्याचा प्रकार करणारे लोक त्यांना “धेडांचे महारांचे राजे” म्हणून उल्लेख करत .

“8:-राजा सयाजीराव गायकवाड यांनी बाबासाहेबांना परदेशात शिक्षणासाठी सहाय्य केले होते. सयाजीराव गायकवाड जन्माने मराठा होते.....”

---> परत इथे जातीच्या किडलेल्या मनाचा दुर्गंध येतो सायाजीरांवाना जातीच्या बेड्यात अडकवून केवळ ते मराठा होते म्हणून श्रेष्ठ होते आणि त्यांनी बाबासाहेबांना परदेशात जाण्यासाठी सहाय्य केल .मुळात सयाजीराव गायकवाड यांच्या प्रशासनात नियम होता कि जे जे विद्यार्थी निष्णात आहेत ,हुशार आहेत मग ते जातीने ,कुळाने कुणीही असो त्यांना शिक्षणानासाठी आर्थिक सहाय्य करणे अर्थात आजच्या भाषेत बँकाप्रमाणे ऋण लोन देणे आणि त्याची परतफेड आपल्या संस्थानामध्ये नोकरीमधून त्या विद्यार्थाचे कर्ज परतफेड घेणे अर्थात बाबासाहेबांनी परदेशातून परत आल्यावर पिता रामजीचा विरोध पत्कारून बडोदा संस्थानात प्रचंड जातिवाद असताना सुद्धा नोकरी करून त्यांचे ऋण फेडले अर्थात रामजीबाबाना बडोदा मधील हे जातीचे चटके त्रास माहित होता म्हणून ते बाबासाहेबांना जाण्यापासून रोखत होते .तरीसुद्धा बाबासाहेबांनी चटके सहन करून संस्थानाच्या कराराच पालन केल .

“9:- बाबासाहेब आंबेडकरांनी शिका आणि संघटीत व्हा हा संदेश मराठा बहुजनांना दिला.
"चांभार घराण्यात जन्माला आलेला नेपोलीयन बोनापार्ट अर्ध्या युरोप खंडाचा बादशाह झाला. अरे ज्याच्या आई बापाचा पत्ता नाही तो रेंसमन हेरॉलड ब्रीटन चा पंतप्रधान झाला. लाहनपणी कोळशाच्या खाणीत काम करणारा अब्राहम लिंकन अमेरीकेचा राषट्राध्यक्ष झाला अरे पण मानुसकी नाकारलेल्या समाजात जन्मलेला आपला " भिमराव " या देशाचा शिल्पकार झाला..........! “

- --> सदर मुद्यात बाबासाहेब देशाचे शिल्पकार आहेत हे डोळे लावून सत्य असलं तरी शिका ,संघटीत व्हा ,संघर्ष करा हा संदेश समस्त भारतीयास दिला त्यालाही विशिष्ट जातीलाच दिला किंवा केवळ मराठा बहुजनांना दिला असा नाही तर भारतातील प्रत्येक नागरिकास दिलेला आहे . युरोप खंडात जातीव्यवस्था किंवा जात नावाची गोष्ट अस्तित्वात नव्हती ना आहे ही जातीयव्यवस्था आणि चातुर्वर्णव्यवस्थेत शुद्राती शुद्र ठरविलेली जात नेपोलीयन बोनापार्ट ला लावणे केवळ हास्यास्पद गोष्ट आहे .

सदर पोष्ट अनेक महिन्यापासून सोशल मिडिया मध्ये फिरतात आणि काही जण अभ्यास न करता इतिहासाची जाण न ठेवता सदर मजकूरच प्रमाण आहे असे मानून तोच खरा इतिहास मानत असतील तर हा निव्वळ अडाणीपणा आहे .इथे बाबासाहेब आंबेडकर ,शिवाजी महाराज ,शाहू महाराज यांना जातीचे लेबल लावून एकमेकांवर अप्रत्यक्षपणे उपकार केलेले आहे अस भासवून जातीचा अंहभाव दाखविणे आणि महापुरुषाचा जय जयकार करणे दोन्हीही विरोधाभासी आहे . बाबासाहेब असो कि शिवाजी महाराज त्या त्या काळानुरूप या महापुरुषांनी काळाचा विचार करून पाऊले उचलली आहेत .शिवाजी महाराजांची सामाजिक बदलापेक्षा स्वराज्य मिळवणे अग्रणीय मानले ती त्या काळाची गरज म्हणून त्यामुळे त्यांचे महत्व कमी होते असे नाही तेही श्रेष्ठच होते आणि आहेत आणि बाबासाहेबांनी सामाजिक बदलासह मानवजातीच्या अधिकारासाठी मानवमुक्तीचा लढा दिला तोही मोठा श्रेष्ठच आहे .त्यामुळे सदर अश्या अनेक पोष्ट महापुरुषांना जातीत विभागतीलही परंतु त्यांचे महत्व कोणामुळे मोठे किंवा कोणामुळे कमी होऊ शकत नाही .म्हणून मला खोट्या आधार नसलेल्या गोष्टींचा गवगवा यांचे खंडण करावे वाटले म्हणून हा सदर लेख .
                                                                                                               - प्रविण जाधव

Wednesday, 5 August 2015



                                            !!! कंचनी चा महाल !!!

माझ शालेय जीवन मेहकर पासून जवळच ११ कि .मी . असलेल्या सुलतानपूर या गावी गेल . रविवारची सुट्टी आणि मेहकर चा बाजार असल्यामुळे नेहमीच वडिलांसोबत ,मित्रांसोबत येण दर आठवड्याला सुरु असे . तो बहुदा २०
वर्षापूर्वीचा काळ असेल एकदा काही मित्रासोबत सिनेमा पाहण्यासाठी गेलो परंतु दुपारचा शो सुरु होऊन बराच वेळ झाला होता मग आता काय करावे तर आम्ही मेहकर मध्ये हुंदडायला लागलो सायकलवर फिरण्याचा आनंद घेऊ लागलो ,मेहकर शहराच्या थोड बाहेर एक पडकी ऐतिहासिक  वास्तू आम्हाला  दिसली मला त्याबद्दल  कुतूहल निर्माण झाल परंतु ही वास्तू कसली याची माहिती कोणालाच नव्हती .पुढे शहरात शिक्षणासाठी आल्यावर महाविद्यालयीन जीवनात या वस्तूबद्दल मी वर्तमानपत्रातून वाचाल तेंव्हा यावर माझ प्रेम अधिक घट्ट झाल . ती ऐतिहासिक वास्तू म्हणजे " कंचनीचा महाल " साहित्य क्षेत्रातील याच मातीतून जन्मलेल्या ना .घ .देशपांडे यांची कलाकृती साहित्यक्षेत्रात अजरामर झाली ती म्हणजेच कंचनीचा महाल !

ना.घ .देशपांडे यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा २१ ऑगस्ट १९०९  रोजी झाला .बालवयातच कवितेचा छंद ना .घ .देशपांडे यांना लागला होता .पुढे एल .एल .बी .करून देशपांडे यांनी वकिली व्यवसायाला मेहकर सत्र न्यायालयात सुरुवात केली .बी.ए.ला असताना इ.स. १९२९ साली त्यांनी लिहिलेली शीळ ही कविता वर्गमित्र गायक गोविंदराव जोशी (जे पुढे जी.एन. जोशी या नावाने प्रसिद्ध झाले) यांनी कार्यक्रमांमधून गायला सुरुवात केली. ती अतिशय लोकप्रिय झाली. पुढे इ.स. १९३२ साली एच.एम.व्ही.ने ती जी.एन.जोश्यांच्याच आवाजात ध्वनिमुद्रित केली. यातून भावगीत हा प्रकार मराठी संगीतक्षेत्रात रूढ झाला. इ.स. १९५४ साली शीळ याच नावाने त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. इ.स. १९६४ साली अभिसार हा नाघंचा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. त्याला महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक मिळाले. पुढे इ.स. १९८६ साली प्रकाशित झालेल्या ख़ूणगाठी या काव्यसंग्रहास साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

याशिवाय कंचनीचा महाल (चार दीर्घकवितांचा संग्रह) व गुंफण (शीळ काव्यसंग्रहाच्या काळापासून तोवर अप्रकाशित राहिलेल्या कवितांचा संग्रह) यांचाही त्यांच्या ग्रंथसंपदेत समावेश होतो. यापैकी मेहकर बाहेरील जी ऐतिहासिक वास्तू उभी आहे त्याला समर्पित असलेल्या आपल्या भावना ना .घ .नी आपल्या  कंचनीचा महाल या दीर्घकाव्य संग्रहात विषद केलेल्या आहेत .
मेहकर जवळील एक पडीक वास्तू जीला कंचनी महाल आपण म्हणतो त्यामागे एक इतिहास म्हणा कि आख्यायिका आहे .यामागे काही भ्रामक जरी असले तरी कंचनी ही एक रूपवान सौदर्यवती लावण्यवती राहिलेली असेल यात शंका नाही .असे म्हणतात .ती अतिशय सुंदर आणि रूपवान होतीच तिला तिच्या रूपाचा अहंकार होता .घुंगरांचे श्रृंगाररसपूर्ण बोल तिथे कायम निनादत असत. अनेक सरदार- सेनापती तिच्या सौंदर्याचे दिवाणे होते. पलीकडे लोणार सरोवराच्या काठी असलेले कमळजा देवीचे देऊळ! तिथे जळणारा नंदादीप ...हे सगळ्या गावाचे श्रद्धास्थान होते. एक सरदार पुत्र तिच्या प्रेमात पडला. तिने आपल्या बरोबर मंदिरात येऊन देवीचे दर्शन घ्यावे अशी त्याची आकांक्षा होती. पण कंचनी पडली आढ्यतेखोर, रुपसंपन्न कलावंतीण. तिला गाव उतरुन पलिकडे जाणे कमीपणाचे वाटले. ती वदती झाली... "मी नाही येणार तिथपर्यंत. माझ्या याच वाड्यात माडीवर माडी बांधून मी देवीचे दर्शन घेईन."... झाले........मजल्यावर मजले चढविण्यासाठी कारागिर राबू लागले आणि एके दिवशी...ती प्रदोष पूजा करायला व देवीचा दिवा पहायला वरती चढली आणि त्यामागील आख्यायिका अशी आहे कि कंचनी तो दिवा पाहते आणि लगेच तिची शिळ होऊन ती खाली कोसळते .याच आख्यायिका आणि कंचनी भोवती फिरणाऱ्या कथेला ना .घ .देशपांडे यांची अतिशय सुंदर काव्य रुपात देऊन साहित्यात अजरामर केले .माझ्या दृष्टीने कदाचित कंचनीचा घातपात झाला असेल ती रूपाने धनवान होतीच परंतु तिचा महाल पाहून ती धनवान असेलच याची खात्री पटते परंतु ना.घ .देशपांडे ने यालाच नवीन आयाम दिला त्या काव्यओळी अशा

" अशीच होती रे निःशब्द मधुर ती रात्र राजसवाणी
असेच खोलात वाहत होते रे या पैनगंगेचे पाणी
सोसून गारठा चंचळ जळाच्या रुपेरी लाटांत न्हाले
आणखी अशी या पश्चिमे कडून चढून वरती आले
गारठ पदर कंपित अधर भरला कलश माथी
जमले होते रे आधीच वरती प्रदोष पूजेचे साथी
अंगाला लंपट झालेले माझे ते विरल वसन ओले
पहात होते रे वरून भाविक आतून कामूक डोळॆ
दूरच्या क्षितीजा वरती होता रे कोवळा ...क्रमश :  "

ना.घ .देशपांडे यांची कविता मनाला भुरळ घालून कंचनी बद्दल भुरळ घालतेच परंतु ना.घ .देशपांडे यांचा साहित्यक्षेत्रात ग्रामीण भागातून येऊन वेगळीच वाट निर्माण केली अशी स्तुतीसुमने ना.धो .महानोर सारखे कवी साहित्यिक वाहायला मागे नाही राहिले . आज कंचनीचा महाल ची ओळख करून देणारे ना.घ .देशपांडे आणि तो पडका महाल सरकार ,पुरातत्व विभाग यांच्याकडून दुर्लक्षित आहे .या महालाचा संवर्धन करणे महत्वाचे आहे . तसेच काही काळ नागपूर आकाशवाणीवर कार्यक्रम सल्लागार समितीचे सदस्य होते. त्याकाळी आकाशवाणीवर फक्त पुरुष निवेदक असत. नाघंचे म्हणणे होते की, स्त्रियांच्या आवाजाचा स्वर पुरुषांपेक्षा उंच असल्यामुळे त्यांना निवेदक म्हणून नेमावे.त्यांची ही सूचना केंद्राने मान्य केली, व तेव्हापासून रेडिओवर निवेदिकांना प्रवेश मिळाला. अशा या कृतीशील आणि साहित्यक्षेत्रात आपले योगदान देणाऱ्या ना .घ . चे स्मारक मेहकर परिसरात व्हावे आणि त्यांची प्रेरणा असलेला कंचनीचा महाल वाचवायला हवा .

                                     -  प्रविण जाधव


Sunday, 19 July 2015


          !!! विठ्ठल म्हणजे बुद्धच !!!

२५०० वर्षापूर्वी तथागत भगवान बुद्धाने क्रांती करून अखिल मानव जातीला बौद्ध धम्म दिला . अनिष्ट चालीरीती अंधश्रद्धा काल्पनिक देव आणि अमानवीय असलेले वेद यांचा भरणा असलेला वैदिक धर्म हा बुद्धानंतर नामशेष झाल्यासारखा झाला .संपूर्ण भारतात आणि भारताबाहेर बौद्ध धम्म आणि बुद्धाची लोकप्रियता इतकी वाढली कि सर्व लोक बौद्ध धम्मात सहभागी होऊन बुद्ध ,धम्म आणि संघाला अभिप्रेत असणार्या मानवधर्माकडे आकृष्ट होऊ लागली .

       यज्ञामध्ये प्राणीहत्या आणि जीवाचा बळी देण्याला बुद्धाने विरोध केला त्यामुळे समस्त मानवजातीला वैदिक धर्माचा तिटकारा वाटू लागला त्यामुळे वैदिक धर्म बहुजन लोकापासून बुद्धाच्या काळात दुरावला . पुढे अनेक शतकापर्यंत बुद्धाची प्रसिद्धी आणि बौद्ध धम्म यांचा प्रचार प्रसार सम्राट अशोक ,कनिष्क ,हर्षवर्धन सारख्या राजांनी केल्यामुळे जनमानसात याचा प्रचंड प्रभाव पडला . अगदी पुष्पमित्र शुंगाने प्रतिक्रांती जरी केली अनेक भिक्खूची कत्तल केली तरीही  सामान्य लोकांना आपल्याकडे ओढण्यासाठी बुद्धाची पूजा ,रथयात्रा , बौद्ध सन इ .गोष्टी सुरूच ठेवल्या होत्या . इ .सनाच्या ८ व्या शतकापर्यंत बौद्ध धम्म लोकांच्या मनात आणि सम्राट अशोक कानिश्काच्या निर्माण केलेल्या विहार ,लेणी ,स्तंभ या स्वरुपात अस्तित्वात होता . काही ठिकाणी बंगाल ,सिंध आणि ओरिसा प्रांतात तर ११ आणि १२ व्या शतकात बौद्ध धम्म टिकून होता परंतु नेमक अस काय झाल कि बौद्ध धम्म नष्ट करण्यात बर्याच अंशी यश वैदिक परंपरेला आल परंतु भगवान बुद्ध व्यक्ती रुपात ते नष्ट करू शकले नाही ? याच कारण बुद्ध हा जगात पोहचला होता परंतु प्रत्येक माणसाच्या मनात घर करून बसला होता . पुढे वैदिक धर्माने हा बुद्धाचाच धर्म आहे म्हणून लोकांच्या मनात आचरणात वैदिक गोष्टी भरून दिल्या .

                     ८ व्या शतकात शंकराचार्याने बौद्ध धम्माच्या समूळ उच्चाटनासाठी अनेक पाऊले उचलली बुद्धाला विष्णूचा अवतार दाखवून जे मुळचे बौद्ध होते त्यांना आपल्याकडे आकर्षित केल आणि ज्या मुस्लीम आक्रमणांनी थोडाफार बौद्ध धर्म विहार ,लेणी,स्तंभ रुपात होता त्याचे आतोनात नुकसान मुस्लीम शासकांनी केले .याचा फायदा घेऊन शंकराचार्याने पुराणे ,मनुस्मृती ,महाभारत ,रामायण या सारख्या गोष्टी करून मुळच्या बौद्ध असलेल्या भारतीय लोकांना वैदिक धर्माच्या गोष्टी घालवून स्वताला मुस्लीम शासकांनी " हिंदू" म्हणून दिलेली शिवी ही स्वीकारली कारण बुद्धाचे विचार धम्म त्यांना हद्दपार करायचा होता . ज्या बुद्धाच्या काळात प्राणीहत्या करून मासभक्षण वैदिक ब्राम्हण करत होते त्यांनी या काळात शाकाहार स्वीकारून आपण सर्व " हिंदू " आहोत म्हणून ८ व्या शतकापासून प्रतिक्रांतीला सुरुवात केली ,जे विहार लेणी होत्या त्यावर ताबा मिळवून तेथे वैदिक अर्थात नंतर हिंदू नाव देऊन आपल वर्चस्व मिळवून भिकारेपनाचा कळस गाठला . शैव आणि वैष्णव पंथ निर्माण केले .वैष्णव पंथ तर बौद्ध धर्माचे भग्न रूप आहे . यापासून समांतर वारकरी संप्रदाय निर्माण झाला . बौद्ध धर्माचे नाव घेण्याला इतकी भीती होती कि त्यामुळे असे पंथ निर्माण झाले परंतु बुद्धाची महिमा प्रसिद्धी कोणीच संपवू शकले नाही म्हणून बुद्धाला विष्णूच्या अवतारात त्यांना दाखवावच लागल .
पंढरपूर चे विहार विठ्ठल मंदिर , तिरुपती चे विहार बालाजी ,ओरिसा पुरी चे विहार जगन्नाथचे मंदिर , केदारनाथ ,अमरनाथ अशा अनेक ठिकाणचे विहारे बळकावून तेथे भग्न काल्पनिक देवांची निर्मिती करण्यात आली .पंढरपूर चे विठ्ठल मंदिर तर अनेक पुराव्यांनी सिद्ध होते कि ते प्राचीन बुद्ध विहार होते आणि विठ्ठलाची मूर्ती ही बुद्धाचीच आहे ."पंढरपुरची मूर्ती वास्तवात बुद्ध मुर्तीही आहे. यावर मी एक प्रबंध लिहित आहे. जो कि पुण्याच्या संशोधन मंडळापुढे वाचला जाईल. पांडुरंग हा शब्द पुंडरीक या शब्दापासून उत्पन्न झालेला आहे. पांढर्या कमळास पाली भाषेत पांडुरंग म्हणतात, याचा अर्थ पांडुरंग दूसरा तिसरा कुणी नसून बुद्ध आहे" हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या  "Who is Pandurang" हा शोध निबंध मार्च १९५५ मध्ये लोणावळा येथे लिहावयास घेतला होता.  विठ्ठल मंदिरात खांबावर बुद्धाच्या ध्यानस्थ मुर्त्या आढळतात . अनेक संत कवींनी विठ्ठल म्हणजेच बुद्ध आहे आपल्या काव्यातून सिद्ध केले आहे . पंढरपूर ची यात्रा आषाड एकादशी ला भरविण्याच कारण कि बुद्धाने आपला प्रथम धम्मोपदेश पंचवर्गीय भिक्खू ला दिला होता .पालीभाषेत पांडुरंग या शब्दाचा अर्थ 'पांढरे कमळ' असा होतो. म्हणजे ज्याने पांढरे कमळ धारण केले आहे असा तो. बौद्ध वांगमयत पांढर्या कमळाला अनन्य साधारण महत्व आहे हे बौद्ध अभ्यासकांना ठाऊकच आहे. आणि याला सबल पुरावा म्हणजे अजंठा येथील बुद्ध लेणी. या लेणीत एक चित्र पद्मपाणी बुद्धाचे आहे, ज्याने पांढरे कमळ हाती घेतले आहे. वर दिलेला एक फोटो अजिंठा लेणीमधील आणि दुसरा विठ्ठलमंदिरातील मूर्तीचा आहे बुद्धाच्या ह्या मूर्तीवर थोडाबदल करून आला जरी असला तरी पूर्ण मूर्ती ते बदलू शकले नाहीत .


लोक देखोनि उन्मत दारांनी आसका |
न बोले बौद्ध रूपे ठेविले जधनी हात ||
नववा वेसे स्थिर रूप तथा नाम बौद्ध रूप |
संत तया दारी! निष्ठान्टती निरंतरी ||
                                                 - संत एकनाथ

बौद्ध अवतार माझिया उदृष्ट | मौन मुखे निष्टा धरियेली ||
मध्ये झाले मौन देव बीज ध्यानी | बौद्ध ते म्हणोनी नावे रूप ||
                                         - संत तुकाराम

कलयुगी बौध्द रुप धरी हरी । तुकोबा शरीर प्रकटला ।।
                                  - संत बहिणीबाई

गोकुळी अवतारू सोळा सहस्त्रावरू ।
आपण योगेश्वरु बौद्ध रुपी ॥
व्रतभंगासाठी बौद्ध अवतार ।
झाला दिगंबर अवनिये ।
ऐसा कष्टी होऊनी बौद्ध राहिलासी ॥
                           - संत नामदेव
 अशी अनेक पुरावे आहेत कि जी बौद्ध विहार आणि विठ्ठल हाच बुद्ध आहे हे अंधपाणाचे प्रदर्शन करणार्यांनी इतिहासाची पाने दवडून वाचावी कि आपण मागील काळाचे मुळचे बौद्ध होतो .
                                           ले .- प्रविण जाधव 



Saturday, 11 April 2015


                                             !!! औद्योगिकरण आणि बहुजन समाज !!!

भारताने स्वतंत्र झाल्यापासून भारतीय संविधानानुसार जो औद्योगिक विकास केला तो संथगतीने का होईना पण आज २०१५ मध्ये औद्योगीकरणाच्या बाबतीत विकसित झाला आहे .याच कारण कि इंग्रजांची औद्योगिक धोरणे आणि त्यांच्या कार्यकाळात ज्या पायाभूत सुविधा अगोदरच तयार होत्या त्यामुळे रस्ते ,रेल्वे मार्ग सागरी मार्ग या मधून व्यापार आणि दळवळणास अधिक गती मिळाली त्याचा उपयोग स्वातंत्र्य काळात अधिक मिळाला ,त्याही पेक्षा भारतात व्यापार वाढीस खरी चालना कोणी दिली असेल तर सम्राट अशोकाने ,सम्राट अशोकाच्या काळात भारत एक संपन्न आणि जगातील महासत्ता होता .त्याकाळात कृषी क्षेत्र मुख्य असल तरी त्यावर आधारित उद्योगाला अशोकाच्या काळात चालना मिळाली .त्यात अनेक प्रकारचे कापड बनविले जाई आणि समुद्राच्या पाण्यापासून मीठ बनविले जाई ,मासेमारी इ व्यवसायाबरोबर शिल्पकलेला जास्त महत्व होत त्याचा व्यापार विदेशातही चालत असे आणि चलन व नाणी याचं नियंत्रण त्यावेळी नियुक्त अमात्य (महामंत्री ) करत असे म्हणून अशोकाच्या काळात भारत "एक सोने कि चिडिया " असा देश होता . कालपरत्वे चातुर्वर्ण व्यवस्था निर्माण झाल्यामुळे विशिष्ट वर्ग आणि शासक यांच्या हातात अर्थव्यवस्था गेली तदननंतर डॉ .बाबासाहेबांनी अर्थव्यवस्थेला सामाजिक न्यायाच रूप देऊन घटनेत बद्ध केल .परंतु स्वातंत्र्यानंतर येणार्या सरकारने भांडवलशाही व्यवस्था हे रूप देऊन निवडक उद्योकाकडे याची मक्तेदारी दिल्याने विशिष्ठ वर्गाचाच विकास साध्य झाला परंतु तळांगळातील शोषित पिडीत बहुजन समाज एक तर सरकारी यंत्रणेचा नोकरदार बनवून राहिला आणि खाजगी क्षेत्रात कामगार म्हणून खाजगी उद्योग क्षेत्रात त्याने जुळवून घेतले याचा असा परिणाम झाला कि बहुजन समाज खास करून sc st obc हा वर्ग उद्योगाचा भाग झाला परंतु कामगार नोकरदार म्हणून !
डॉ .बाबासाहेबांनी या देशाची राज्यघटना सामाजिक अभिसरण लक्षात घेऊन लिहिली "शिका संघटीत व्हा संघर्ष करा " या मूलमंत्रासोबतच सामाजिक क्रांतीशिवाय राजकीयक्रांतीला महत्व दिले.काहींनी शासनकर्ती जमात बनण्याचा अर्थ राजकीय क्रांतीशी लावून आर्थिक ,सामाजिक क्रांतीकडे पाठ फिरविली .त्याचा असा परिणाम झाला कि जी अर्थव्यवस्था मागासवर्गीय तळांगळातील लोकांच्या हाती असायला हवी होती तो वर्ग नोकरी कामात व्यस्त झाला आणि ३ % वर्गाच्या हाती उत्पादन आणि औद्योजकता गेल्यामुळे भारताची उत्पादन क्षमता केवळ ६ % राहिली तर त्याच लोकसंखेच्या थोड्याफार पुढे असलेला चीन हा देश उत्पादन वाढीत ७६ % वर पोहोचला हा फरक विकसित चीन मध्ये आणि विकसनशील भारतामध्ये राहिला .
आज बहुजन SC ST OBC जर उद्योजकतेकडे वळून औद्योगीकरणाचा भाग झाल्यास नक्कीच अर्थव्यवस्थेत बदल होईल ,देशाचा आणि समाजाचा आर्थिक स्तर नक्कीच उंचावेल . उद्योग व्यवसाय कडे वळताना मुख्य भांडवल हि अडचण येणे हा पहिला प्रश्न सर्वासमोर निर्माण होतो पंरतु सरकारच्या योजना काही काही वित्त सहाय्य मंडळे यांचा विचार केल्यास ,कमी भांडवलातून आणि संघटीतरित्या ५ ते १०० लोकसमूह बनवून उद्योग व्यवसाय निर्मिती होऊ शकते आणि ते सोयीस्कर राहते .उद्योग व्यवसायाचे मुख्य दोन भाग पडतात . १ ) Manufacturing (निर्मिती )
२ ) Service (सेवा )
निर्मितीचे परत १ ) Micro (सूक्ष्म ) ज्यात कमीत कमी २५ लाखाहून उलाढाल
२ ) small (लघु ) ज्यात ५ लाख ते ५ कोटी पर्यंत उलाढाल
३ ) Medium (मध्यम )
ज्यात ५ कोटी ते १० कोटीच्या वर उलाढाल होते असे उद्योग
सेवा क्षेत्रात सारख्याच प्रकारच्या उद्योगांची विभागणी होते .सर्वात महत्वाच नियोजन कुठला उद्योग व्यवसाय ,आवड ,कला ,कुवत आर्थिक इ बाबींचा विचार केला जातो .सबंधित उद्योगांच कागदोपत्री नियोजन त्यासबंधी लागणारी कागदपत्रे परवाने करारपत्रे इत्यादी बाबींचा विचार करणे गरचेजे असते .तसेच सुरु करण्यात येण्यार्या उद्योगाची चाचपणी मार्केट रिसर्च उत्पादनाची किंमत नफा तोटा याचा पायभूत विचार करणे गरजेचे आहे .
आपल्या व्यवसायाच्या आखणीनुसार वित्त सहाय्य करणाऱ्या संस्था मंडळ यांच्याकडे उद्योगाच्या लागणाऱ्या भांडवल व प्रोजेक्ट रिपोर्ट योग्य रीतीने सादर करणे आवश्यक आहे . काही महिला उद्योजकासाठी सिडबी ,सिडो (small industries development organization), SEWA (Self employer women association ) तसेच नाबार्ड ,इतर बँका वित्तीय संस्था उद्योगासाठी वित्त पुरवठा करतात .अशा अनेक गोष्टींचा नकारात्मक विचार न करता सकारात्मक विचार करून उद्योजक व्यवसायाकडे वळून नोकरी घेणार्या पेक्षा नोकरी देणारे होणे केंव्हाही चांगले . तसेच बहुजन समाजातील बेरोजगार शिक्षित तरुणांना उद्योग व्यवसायाकडे वळवून आर्थिक विकास साधण्यासाठी adv .प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील "गाव तेथे उद्योग" या पूर्तीसाठी भारिप बहुजन महासंघ अगोदरच २० उद्योगांच्या उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्य करत आहे .बहुसंख्य तरुण वर्ग या कडे वळला पाहिजे यासाठी हा प्रयत्न .
- प्रवीण जाधव 
प्रकल्प समन्वयक ,
भारिप उद्योजक विभाग

(पुढील भागात कृषी क्षेत्रास पूरक उद्योग आणि त्यांची माहिती )

!!! जात निर्मूलनाचा लढा बुद्धाकडे नेणारा !!!
२०१३ रोजी प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी "शालेय दाखल्यावरून जात हद्दपार करावी." आणि "राजकीय आरक्षण रद्द कराव " हि भूमिका मांडली . रिपाइं नेते रामदास आठवले यांनी ही भूमिका 'दलित विरोधी' ठरवली होती , तर जोगेंद्र कवाडे (पीपल्स रिपब्लिकन पार्टी ) यांनी तिला 'भारतीय संविधानाला छेद देणारी' ठरवून प्रकाश आंबेडकरांवर राखीव जागा संपवण्याची सुपारी घेतल्याचा आरोप केला होता . खासदार रामविलास पासवान यांनी ती 'पूर्णत: चुकीची' ठरवतानाच 'जोपर्यंत जातिव्यवस्था व जातीयवाद अस्तित्वात आहे, तोपर्यंत दलित आदिवासींना राजकीय आरक्षणाची गरज आहे,' असे म्हटले होते .
" Annihilation of Caste " डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी जात निर्मुलनाबद्दल अत्यंत मौल्यवान विचार मांडले . जात नष्ट होणे म्हणजेच बुद्ध तत्वज्ञान स्वीकारणेच होय . वैदिक धर्माने निर्माण केलेली जातीयव्यवस्था हि विषमतावादी आणि मानवताविरोधी होती त्यात मानवांचे जातीनिहाय भाग पाडून वर्णव्यवस्था निर्माण करून भेदाभेद करून मानवाला पशुसमान वागणूक देऊन विशिष्ट वर्गाच्या हाती सत्ता संपत्ती चे अधिकार दिले .त्या विरुद्ध पहिला बंड तथागत भगवान बुद्धांनी केला ,जात पात यांना बौद्ध धर्मात थारा नाही हे सांगितलं . अनेक नद्या महासागराला जाऊन मिळतात तसाच जात पंथ नष्ट होऊन एकच धम्म तयार होतो तो मानवतावादी बौद्ध धम्म होय . जात निर्मूलनाचे विचार तथागत ,बाबासाहेबांनी मांडले त्याच विचारांना सामाजिक समतेचे रूप यावे म्हणून तीच भूमिका मा .बाळासाहेब आंबेडकर पुढे नेत असतील ,जात पात नष्ट होऊन धर्म आणि राष्ट्रीयत्व कायम होणार असेल तर आपण जातीत आणि राजकीय लाभासाठी बुद्ध बाबासाहेब यांच्या विचारांनाच विरोध करत आहोत ?
डॉ .बाबासाहेबांनी १९५६ साली लाखो लोकांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली परंतु शासन दरबारी "महार " म्हणून नोंद होती .त्या नंतर रिपब्लिकन पक्षाचे अनेक पुढारी बी .सी .कांबळे ,दादासाहेब गायकवाड अनेकांनी आंदोलने उपोषणे केली परंतु सरकारकडून निराशा मिळाली ,सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांनी तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्याशी चर्चा करून पण बौद्धांच्या सवलतीचा प्रश्न महार म्हणूनच अडकून पडला परंतु १९८९ साली तत्कालीन व्ही.पी.सिंग पंतप्रधान झाले तेंव्हा प्रकाश आंबेडकर यांनी बौद्धांच्या सवलतीचा प्रश्न मांडून तो राजकीय समझोत्याने सोडवून घेतला जे बाबासाहेबांच राहिलेलं स्वप्न बौद्धांचा समावेश मंडल आयोगानुसार अनुसूचित जातीत करून बौद्धांना सवलती मिळवून दिल्या ,तरीही आजही आपण जातीत अडकून बौद्ध धम्माला जे जात निर्मुलन पूरक होत ते करण्यात आपण अनुयायी म्हणून अपयशी आहोत .
प्रकाश आंबेडकरानी इतर वर्गाला सोबत घेऊन पुणे पासून कोल्हापूर औरंगाबाद लातूर इ .ठिकाणी जातीअंताची चळवळ उभी करण्यासाठी जातीअंत परिषदांना सुरुवात केलेली आहे त्यात फुले शाहू आंबेडकरी म्हणवणारे पक्ष संघटना अनुयायी म्हणून आपण कुठे आहोत ? जात निर्मुलनासाठी बाबासाहेबांनीच प्रयत्न केला आणि त्यांच्याच नातवानेच सर्वकाही कराव त्यांनीच " अवतारवादाची " भूमिका घेऊन " अत्त दिप भव " न होता " यदा यदा धर्मस्य ग्लानी भवती भारत " हा वैदिक तत्वानेच आपण आंबेडकर अनुयायी जात आहोत . डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात एक प्रावधान केल होत कि राजकीय आरक्षण हे केवळ १० वर्षासाठी देण्यात याव परंतु आरक्षण (अराजकीय नव्हे )
या गोष्टीचा राजकारणासाठी उहापोह करण्यात आला आणि स्वतः ला आंबेडकरवादी म्हणवणारे नेते पुढारी यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय आरक्षण संपाव या भूमिकेला स्वतःच्या राजकीय भुकेपायी विरोध केला . डॉ .बाबासाहेब आंबेडकर म्हणतात कि जे राखीव जागेवरून निवडून जाणारे प्रतिनिधी मागासवर्गीयांच्या हक्काबाबत चूप राहत असतील तर हे राजकीय आरक्षण काय कामाचे आणि ते नको आहे ,संदर्भ -डॉ .बाबासाहेब आंबेडकर भाषण खंड १८ भाग २ . हिच भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली तर त्या भूमिकेत बाबासाहेबच आहेत .
आज ज्या जातीअंत परिषदेने विविध ठिकाणी परिषदा बाळासाहेब आंबेडकर घेत आहे त्याबद्दल हिंदुत्ववादी संघटना आर एस एस बजरंग दल हिंदू महासभा ह्या चूप आहेत . प्रकाश आंबेडकर यांनी सुरु केलेला जातीअंताचा लढा निष्प्रभ करण्यासाठी त्यांना जातीव्यवस्था टिकवून ठेवणे अगत्याचे आहे ,म्हणून या जातीअंताचा लढ्याचा धसका घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सरसंचालक मोहन भागवत यांनी " एक गाव एक विहीर एक स्मशान " हि केविलवाणी भूमिका मांडली परंतु फुले शाहू आंबेडकर म्हणवणारे आपण जोवर जातीअंतासाठी पुढे होणार नाही तोवर जातीव्यवस्था मजबूतच होईल .जिथे जातीअंत होणार तिथे फक्त धम्म असणार म्हणजेच जाती अंतचा अंतिम मार्ग बौद्ध धम्माकडेच नेणारा आहे .
                                                                                        
                                                                                              - प्रविण जाधव

Sunday, 21 September 2014


भाग ३
          बाबरी मशीद

याच दरम्यान ६ डिसेंबर १९९२ साली दुसरे एक संकट चळवळीसमोर उभे राहिले .ते म्हणजे बाबरी मशिदीच्या निमित्ताने .बाबरी मजीदचे आंदोलन म्हणजे उच्चवर्णीयांच्या हिंदू संघटनेचा राजकीय उठाव .या सवर्ण हिंदू संघटनानी जसा बाबरी मशिद प्रश्न उचलला तसाच त्यांनी राखीव जागेचा प्रश्नही उपस्थित केला .राखीव जागेच्या प्रश्नाला सरळ सरळ विरोध केला तर हिंदू दलित आणि हिंदू ओबीसी आपल्याबरोबर बाबरी मशिदच्या प्रश्नांवर कदाचित सोबत राहणार नाही म्हणून त्यांनी घटनेलाच विरोध केला आणि घटना बदललीच पाहिजे अशी भूमिका घेतली अशी भूमिका घेतली .घटना बदलामध्ये त्यांचे दोन महत्वाचे मुद्दे होते ,ते म्हणजे संसदीय लोकशाही ऐवजी अध्यक्षीय लोकशाही आणणे आणि दुसरा राखीव जागा काढून टाकणे .त्यांनी जो धोरणात्मक बदल केला तो राखीव जागा ऐवजी घटनाविरोधी भूमिका घेतली .हि भूमिका घेण्यामागचा त्यांचा हेतू कि सवर्ण हिंदू आणि ओबीसी हिंदू यांच्यात पडत चाललेली दरी मिटवायची असेल तर आपण राखीव जागाविरोधी आहोत असे दर्शविता कामा नये .या सर्व धार्मिक संघटनानी भाजपा आणि शिवसेनेला पुढे केले .खरे तर त्यांची दखल घेण्याची गरज नव्हती .उच्चवर्णीय मंडळींनी यापूर्वी राखीव जागेच्या विरुद्ध गदारोळ उभा केला होता .त्यांच्यातला जो धोरणात्मक बदल त्यांनी केला त्याचे कारण हे की राखीव जागेच्या विरुद्ध त्यांनी भूमिका घेतली .ओबीसी आपल्याकडून निघून जातो आणि घटनाविरोधी भूमिका आपण घेतली तर आंबेडकरी समूह जोरदार रीअक्शन देईल .त्यांच्या रिअक्शन ने आपल फायदा होईल .त्यांना आंबेडकरी चळवळीतील नेते व कार्यकर्ते हे reacti रिअक्शन देण्यात फार तत्पर आणि उत्साही आहेत याची जाणीव होती .आंबेडकरवाद्यांनी घटना घटना बदलाला रिअक्शन दिली कि सवर्ण हिंदू आणि ओबीसी यांना एकत्र आणता येते हे त्यांचे गणित होते .आंबेडकरी चळवळ एकजातीय स्वरुपाची असल्यामुळे ‘आपली घटना बदलत आहेत ‘ ह्या आंबेडकरवाद्यांच्या विधानाचा अर्थ हिंदुत्ववादी संघटनांनी सोयीस्करपणे ‘हि त्यांची घटना ‘ असा केला आणि म्हणून ते चवताळलेत असा प्रचार केला .आणि म्हणून लोकांची दिशाभूल केली .आपल्याला ‘आपली घटना बनवायची आहे ‘ असा प्रचार सुरु केला व दुसरी घटना बनविण्यासाठी वातावरण तयार करायला सुरुवात केली .आंबेडकरी मंडळी आपण काय भाषण देतो याचा सारासार विचार कधीच करीत नाहीत .त्यामुळे अनेकदा आपली भाषणे अनेकदा विरोधकांच्या हातात आयते कोलीत देतात .याला भाबडेपण म्हणावे ,अज्ञान म्हणावे कि हेतुपुरस्कर हे मला तरी समजत नाही .आंबेडकरवादी चळवळ हि अशाप्रकारे प्रतिक्रियावादी पद्धतीने पुढे चालवत गेली तर जास्त काळ टिकणार नाही .परंतु राखीव जागांचा मुद्दा हा घटनेचा अविभाज्य घटक आहे आणि तो संविधानाचा मुलभूत पाया आहे हे लक्षात आल्यानंतर भाजपा व शिवसेनेने हेतुपुरस्कर घटनाविरोधी भूमिका घेतली व घटना बदलाचा नारा दिला . भारिप ने यातून मार्ग काढण्यासाठी शेगाव ला १९९३ मध्ये बहुजन महासंघाचे अधिवेशन घेतले .त्या अधिवेशनात पक्षाने शंकराचार्याच्या गादीवरती ओबीसी मधील विद्वान साधू वा संताची नेमणूक हिंदुत्ववादी संघटनानी करावी अशी मागणी केली .उच्चवर्णीय हिंदू हे ओबीसींना बरोबरीने आणि समानतेने वागवत नाहीत ,भेदभावाने वागवितात .ओबीसींना हे स्पष्ट होण्यासाठी पक्षाच्या वतीने तशी मागणी केली होती .ओबीसी हिंदुना स्वतःचे शत्रू मित्र कोण आहेत हे समजावे व त्यांची अस्मिता जागृत व्हावी यासाठी हे आवश्यक होते .शेगावची मागणी व मंडल कमिशनचा स्वीकार यामुळे बीजेपी –सेना हिंदूचे राजकीय संघटन उभे करीत होते त्याला खूप मोठा शह मिळाला .त्यांनी राखीव जागा आंदोलनापेक्षा बाबरी आंदोलनाला अग्रक्रम दिला .
आंबेडकरी चळवळी ने नव्याने आलेल्या आर्थिक धोरणाच्या विरोधात चळवळ उभारली असती आणि खाजगीकरणाच्या विरोधात स्पष्ट भूमिका घेतली असती तर ओबीसीनां हिंदू धार्मिक संघटनेने केलेला धोरणात्मक बदल म्हणजे राखीव जागाविरोधी होण्याऐवजी घटनाविरोधी होण यातला फरक त्यांना समजाविता आला असता आणि खाजगीकरण आणि बाबरी मशिद हे दोन्हीही राखीव जागाविरोधी आहेत हे स्पष्ट झाले असते .यामुळे कदाचित त्यावेळची विधवंसकतेची तीव्रता कमी झाली असती .आंबेडकरी चळवळीमध्ये दादासाहेब गायकवाड यांनी केलेला भूमिहीनांचा सत्याग्रह हा अपवाद आहे .यापुढे तरी आंबेडकरी चळवळ सामाजिक प्रश्नाबरोबर आर्थिक प्रश्नांना प्राधान्य देणार असती तर नंतर झालेल्या विध्व्सांची तीव्रता कमी करता आली असती .आंबेडकरी चळवळीच्या या वाटचालीला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी केलेला ‘भूमिहीनांचा सत्याग्रह’ हा एकमेव अपवाद आहे .
बाबरीमुळे उच्चवर्णीयांचा डाव सफल झाला .त्यामुळे त्यांनी राखीव जागेच्या प्रश्नावरून समाजाचे लक्ष्य विचलित केले .असा परिणाम समाजात होऊ नये .उच्चवर्णीय हिंदू आणि ओबीसी हे एकत्र झाले तर विस्कटलेली आंबेडकरी चळवळ पुन्हा एकजातीय होण्याचा धोका दिसत होता म्हणून ओबीसीच्या चळवळीला पाठींबा देणे ,त्या उभारणे महत्वाचे होते .
व्ही .पी .सिंग
बोफोर्स प्रकरणाच्या वादातून विश्वनाथ प्रताप सिंग हे कॉंग्रेस मधून बाहेर पडले होते .त्यांचा राजकीय प्रवास जनता दल निर्माण करण्यापर्यंत झाला .या पक्षाबरोबर आम्ही राजकीय समझोता व करारनामा करण्याचा निर्णय घेतला .या पक्षाबरोबर सत्तेत आलो तर पुढील प्रश्नावर अंमलबजावणी होईल .
१ ) बौद्धांना सवलती
२ ) प्रशासनाकडून सर्वसामान्य मागासवर्गीय जनतेवरती होणारे अन्याय –अत्याचार व त्याचबरोबर राज्यांनी एस .सी ,एस.टी .साठी केलेले प्रावधान याची कशापद्धतीने अंमलबजावणी हिते ,याची चौकशी व्हावी .
३ )एस .सी .,एस .टी . वित्तीय महामंडळानां दरवर्षी किमान दोनशे कोटींचे अनुदान मिळावे
४ ) डॉ .बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी वर्ष साजरे करावे
५ ) मंडल आयोगाची अंमलबजावणी व्हावी .
६ ) डॉ .बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र पार्लमेंटच्या सभागृहात लावणे .
१९९० साली सत्ता आली आणि प्रश्नांची लगेच सोडवणूक झाली .राज्यव्यवस्था अनुकूल असेल तर प्रश्न लगेच सुटू शकतात हे यातून सिध्द झाले . १९५६ ते१९९० या काळातील सर्व आंबेडकरी चळवळीतील पत्रक ,पोस्टर्स ,मोर्चे ,आंदोलने यांच्याकडे आपण नजर टाकली तर सर्वात प्रथम बौद्धांना सवलती दिल्याच पाहिजेत हि मागणी असायची .या मागणीनंतर इतर मागण्या असायच्या .
 क्रमश :

-    adv  प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर 


                                   भाग २

  
सतरा लाख मतदार

 लोकशाहीमध्ये कुठल्याही राजकीय चळवळीची ताकद तिला मिळणाऱ्या मतदानातून दिसते .निवडणूक हे साधन आहे .निवडणुकीमध्ये हे सामर्थ्य दाखविणे आवश्यक असते .आंबेडकरी चळवळ जी निवडणूकीपासून कोसभर दूर गेली होती .एव्हढेच नव्हे ,तर समझोत्याच्या राजकारणाची स्वतःचे राजकीय अस्तित्व हरवून बसली होती ; काही निवडणुकांमध्ये अशाही घोषणा झाल्या होत्या कि ,’सिट ऑर नो सिट’ ,’व्होट फॉर कॉंग्रेस ‘ तिला निवडणुकीच्या आखाड्यात आणण्यासाठी १९८५ -८६ च्या विधानसभा ,लोकसभा निवडणुका लढवून पक्षाने १७ लाख मते मिळविली .हेच पक्षाचे खरे भांडवल .त्यानंतर अनेक लढे व निवडणुका झाल्या .पक्षावरचा विश्वास  डगमगला नाही .या १७ लाख मतदाराच्या जोरावर आम्ही सत्ता या बाजूची त्या बाजूला फिरवू शकतो हे  प्रत्यक्षात दाखविले .निवडणुकीच्या माध्यमातून पक्षाला ताकद मिळाली . त्यामुळे भटके –विमुक्त ,आदिवासी ,ओबीसी , ‘नाही रे वर्ग ‘ यांचे पक्षाकडे आकर्षण वाढले .या प्रक्रियेमुळे सत्ताधारी वर्गात भीती निर्माण झाली .डॉ .बाबासाहेब आंबेडकरानी इतिहासकालीन सांस्कृतिक रचनेची मीमांसा करताना ब्राह्मण सोडून इतर सर्वच जाती या सांस्कृतिकदृष्ट्या एकच आहेत (सामाजिक नाही ) हे सूत्र मांडले होते .आणि म्हणूनच सामाजिक स्वातंत्र्याचा लढा ब्राह्मण्याविरुध्ह झाला .बदलत्या परिस्थितीत महाराष्ट्रात ब्राह्मणांची जागा आता मराठा समाजाने घेतली आहे .त्यामुळे आता सार्वजन आम्हाला सत्तेत वाटा मिळाला पाहिजे असा आग्रह मराठा समाजापुढे करताहेत .तो मिळत नसल्यामुळे हा लढा मराठविरोधी होत आहे .त्यांच्याबाबत इतर समाजात तिरस्काराची भावना निर्माण झाली आहे .यापुढे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठाच असेल ,असा ज्यावेळी प्रचार करण्यात आला त्याचवेळी त्याचवेळी मराठेतर समाज आपल्याकडे आकर्षित होऊ लागला .या दरम्यान १९९२ साली आम्ही किनवटची पोटनिवडणूक लढविली .पक्षाने आदिवासी उमेदवार निवडून आणला .पक्षाचे हे मोठे यश होते .पक्षाला ताकदही मिळाली .याच काळात नांदेडच्या गौतम वाघमारे यांच्या हौतात्म्यामुळे सरकारला पुन : नामांतर प्रश्नावर विचार करण्याची पाळी आली .त्याचवेळी मंडल कमिशनच्या शिफारसी स्वीकारण्यात याव्या या मागणीसाठी झालेल्या आंदोलनामुळे ओबीसी समूह जागरूक होत होता .त्याचबरोबर मंडल आयोगाला झालेल्या कडव्या विरोधामुळे उच्चवर्णीय हिंदू समूह आपल्या बाजूने नाही याचेही भान प्रथमच ओबीसींच्या समूहांना होत गेले .बाबासाहेबांनी आपल्यासाठीहि तरदूत ठेवली आहे हि जाणीव त्यांच्यात पसरत होती .त्याचा परिणाम म्हणजे बाबासाहेबांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन बदलत होता .पक्षाने १९९३ मध्ये नागपूरला काढलेल्या मोर्चात पहिल्यांदा हा ओबीसी समूह फार मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता .हा आंबेडकरी चळवळीतील लक्षवेधी बदल होता .पक्षाकडे आलेले हा ओबीसी पाहून सरकार हादरले आणि त्याचबरोबर नामांतराचा प्रश्न सामंजस्याने मिटविण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली .जे नामांतर झाले त्यामध्ये आंबेडकरी समूह आणि मराठा समाज या दोघांच्याही अस्मिता कायम ठेवून नामांतर झाले .हा तोडगा त्याही काळी मांडण्यात आला होता .परंतु त्यावेळीच्या नेतृत्वामध्ये ते स्वीकारून जो कोणी विश्लेषात्मक अभ्यास करील ;त्याच्या पुढे नेहमीच कोडे राहणार आहे , कि एव्हढे जीव आणि मालमत्ता कुर्बान का केली ? अठरा वर्ष रेंगाळत असलेला नामांतराचा प्रश्न १९९४ साली निकाली काढला .

              रिडल्स
या पक्षाच्या नव्या चेहर्यामुळे अनेक राजकीय समीकरणे बदलू लागली .पक्षाची ताकदही वाढली .त्याचबरोबर हि ताकद मोडून काढण्यासाठी अनेक राजकीय खेळी सुरु झाल्या .त्यातील एक महत्वाची घटना म्हणजे डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या ‘रिडल्स इन हिंदूइझम’ मधील ‘रिडल्स ऑफ रामा ‘ याच्या विरोधात फेब्रुवारी १९८७ मध्ये वातावरण पेटविण्यात आले .त्याच जातीयवादी व धर्मांध शक्तींनी पुढाकार घेतला व त्यांनी शिवसेनेसारख्या धर्मांध राजकीय पक्षाला पुढे करून हा लढा आक्रमक केला .त्याचे कारण आंबेडकरी चळवळ हि एकजातीय न राहता ,ती वेगवेगळ्या समदुखी समूहांची चळवळ होऊ पाहत होती .त्यात ती यशस्वी झाली तर आपल्या पारंपारिक सत्तेला धक्का पोहोचेल हि भीती होती .डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतरानंतर कट्टरपंथी हिंदू संघटनांनी मराठा समाजाला हाताशी धरून धर्मातरीत समूहाला व्यवस्थितपणे एकाकी पाडले .त्यांना ‘धर्मबुडवे ‘ म्हणून संबोधले .याचा परिणाम म्हणजे धर्मांतरित बौद्धांना इतरांपासून राजकीयदृष्ट्या त्यांनी एकाकी पाडले .परंतु दुसर्या बाजूने त्याचा फायदा असा झाला कि ,धर्मांतरित समूह स्वता:कडे व स्वतःच्या चळवळीकडे अंर्तमुख होऊन पाहू लागला .या घटनांमुळे एका बाजूला त्यांनी धर्मांतरित समूहाच्या लढाईला सुरुवात केली आणि दुसर्या बाजूला त्यांनी नव्याने निर्माण होणार्या सामाजिक व्यवस्थेत समता आणि बंधुत्वाचे तत्व रुजविण्यासाठी प्रयत्न केला .त्यांना मिळालेल्या या नव्या स्वातंत्र्यामुळे व दृष्टीमुळे त्यांनी स्वतः ला शिक्षित करून घेतले .सरकारी नोकर्यांमध्ये प्रवेश केला .आर्थिक बदलही झाला .स्वतः मध्ये आणि आपल्या नातेवाईकामध्येही त्यांनी परिवर्तन घडवून आणले .त्यांच्यावर जी सामाजिक बंधने लादण्याचा प्रयत्न झाला ; तो त्यांनी हाणून पाडला.अशा बंधनांची त्यांनी पर्वादेखील केली नाही .स्वतः मध्ये परिवर्तन घडवून आणल्यानंतर त्यांनी समदुखी समूहाचा शोध घेण्यास सुरुवात केली .त्याला बंधनातून मुक्त करण्यासाठी ते धडपडू लागला .इतरांच्या प्रश्नांवरही ते रस्त्यावर उतरले .मंडल आयोगाची अंमलबजावणी ,अत्याचारविरोधी भूमिका ,विषमता विरोधी पुढाकार हि त्यातली काही ठळक उदाहरणे आहेत .या प्रक्रियेतून ते  ‘धर्मबुडवे’ या प्रतिमेमधून बाहेर पडले .उलट ते इतरांसाठी परिवर्तनाचे एक प्रतिक बनले  आहेत व सामाजिक बंधने मोडण्यात ते यशस्वी होत आहेत हे लक्षात येताच रिडल्स प्रश्न उपस्थित करून व्यापक होणार्या त्यांच्या चळवळीला पुन्हा जातीपुरती संकुचित करण्याचा प्रयत्न्न झाला .हि परिस्थिती निर्माण करण्यात आली .कारण त्यांना माहित होते कि , आंबेडकरी चळवळीतील माणूस ‘प्रतिक्रिया’ देण्यामध्ये तत्पर आहे .त्यांनी प्रतिक्रिया म्हणून हिंदू देव देवतांना शिव्या द्यायला सुरुवात झाली कि ,जे हिंदू राजकीय दृष्ट्या पक्ष सोडल्याशिवाय गत्यंतर नाही . या परिस्थितीचे भान ठेवून आंदोलन हे १) आंबेडकरी अस्मिता विरुध्द हिंदू अस्मिता असे होणार नाही . २) हे आंदोलन लेखन स्वातंत्र्य याच मुद्यावर लढले गेले पाहिजे ३) आंदोलनाचे केंद्र हे मुंबई शहर राहिले पाहिजे  ४) नामांतर आंदोलनातील त्रुटी या आंदोलनापासून वगळल्या गेल्या पाहिजेत या मुद्यावरच लक्ष केंद्रित होईल हे आम्ही जाणीवपूर्वक पहिले व तशी काळजी घेतली .
 रिडल्सच्या प्रश्नावर वेगवेगळे मतप्रवाह निर्माण होऊ नयेत तर एकच प्रवाह निर्माण व्हावा हा दृष्टीकोन समोर ठेवून आम्ही आंबेडकरी चळवळीतल्या सर्व संघटना /नेत्यांना एकत्र आणले .या सर्वांना एकत्र आणायचे होते ; त्याचे कारण त्यांना मोकळे सोडले असते तर प्रत्येकाने मीच बाबासाहेबांच्या विचारांचा ‘सच्चा पाईक’ आहे हे सिद्ध करण्यासाठी कडव्यातली कडवी प्रतिक्रिया देत तेहत्तीस कोटी देवांचा उद्धार केला असता .त्यांना शिव्यांची लाखोली वाहिली असती .चळवळीला पोषक वातावरण निर्माण करण्याऐवजी त्यांनी त्यांच्या भाषणातून शत्रूच निर्माण केले असते .असे झाले असते तर आंबेडकर चळवळीच्या बाहेरील समूह जे परिवर्तनाच्या बाजूने आहेत .त्यांची दारे चळवळीला बंद झाली असती .नामांतर आंदोलनासारखी परिस्थिती निर्माण झाली असती .मला हे कधीच कळले नाही कि ,तेहत्तीस कोटी देवांना शिव्या दिल्यामुळे चळवळीचे कसे भले होणार आहे ? उलट चळवळीला पोषक वातावरण निर्माण होण्याऐवजी अशा प्रतिक्रिया आणि अशा भाषणामुळे आपण शत्रूच निर्माण केले आहेत .या सर्वाना एकत्र करून पक्षाने ठरविलेली भूमिका सर्वासमोर गेली आणि त्यामुळे घटनेने बहाल केलेले विचाराचे आणि लिखाणाचे स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे याचवरती रिडल्सचा प्रश्न फिरू लागला या भूमिकेमुळे समाजातील अनेक संघटना ,विचारवंताना आपल्या बाजूने येण्यास पोषक वातावरण निर्माण झाले .त्यामुळे आंबेडकरी चळवळी शिवाय इतरही ‘लेखन स्वातंत्र्य अबाधित राहिले पहिजे’ हि भूमिका घेणार्यांना आपल्याबरोबर यायला काहीच अडचण राहिली नाही .त्यांचा पाठींबा आणि सहभागामुळे महाराष्ट्र शासनाला ‘रिडल्स’ जसेच्या तसे प्रकाशित करावे लागले .येथे दोन गोष्टीचे स्मरण आपणास करून देऊ इच्छितो .आंबेडकरी चळवळीतील प्रस्थापित नेते त्यावेळी मी इतरांपेक्षा मी कसा लायक आहे हे सिद्ध करण्यासाठी कटिबद्ध झाले होते .ते नेतृत्वासाठी भांडत होते .त्यावेळचा ‘नवाकाळ’ नजरेखालून घातला तरी हि परिस्थिती आपल्या लक्षात येईल .त्याचा एक फायदा आम्हाला असा झाला कि हे नेतृत्वासाठी भांडत राहिल्यामुळे रीदाल्सचा प्रश्न सोडविण्यासाठी आम्हाला स्वातंत्र्य मिळाले त्यामुळे जी उद्धिष्ठे समोर ठेवून लढा उभा केला त्याच प्रश्नावरती रिडल्सची चळवळ केंद्रित करण्यात यश आले .त्यात ज्या दक्षता घ्यायच्या त्या घेता आल्या .त्यापैकी सर्वात महत्वाची दक्षता म्हणजे कुठल्याही परिस्थितीत हा लढा आंबेडकरी अस्मिता विरुद्ध हिंदू अस्मिता असा होऊ दिला होऊ द्यायचा नाही त्यात आम्ही यशस्वी झालो .दुसरी महत्वाची बाब म्हणजे हा लढा शांततेने लढायचा .दंगल करून नव्हे .हा आंबेडकरी चळवळीचा संदेश लोकांना द्यायचा होता ,तो दिला . बाळ ठाकरे यांनी मुंबईत त्यावेळी मोठा मोर्चा काढून दलितांची घरे जाळा असा संदेश दिला होता ; त्याचवेळच्या परिस्थितीचे भान ठेवून मुंबईत बंद पडलेल्या गिरणी कामगारांच्या घरातल्या चुली पेटवू या असे आवाहन मी केले होते .त्यातून ठाकरेंची फजिती झाली आणि समयसूचकतेतून प्रश्न सुटायला मदत झाली .त्यामुळे सरकारने पुन्हा रिडल्स इन हिंदूइझम प्रकाशित केले .नामांतराचा लढा हा मराठा अस्मिता विरुद्ध आंबेडकरी अस्मिता असा होता .परंतु रिडल्सचा लढा हा हिंदू अस्मिता विरुध्द आंबेडकरी अस्मिता एव्हढा व्यापक होता तरीही कुठेही दंगल आणि रक्तपात न होता तो प्रश्न सोडविण्यात यशस्वी झालो .
‘येरे माझ्या मागल्या ‘ या म्हणी प्रमाणे एकत्र आलेले नेते आणि संघटना ,आंबेडकरी चळवळीचे स्वतःचे स्वतंत्र राजकारण करण्यापेक्षा पुन्हा कुणाच्या ना कुणाच्या ओंजळीने पाणी पिण्याच्या राजकारणात गर्क झाले .ते आपल्याला राजकीय मित्रांबरोबर समझोता करत फिरत राहिले .नेते जरी वेगवेगळे राहिले तरी रिडल्समुळे एकत्र आलेल्या जनसमुहाची ताकद पक्षाबरोबर राहिली .त्या भरवशावर पक्षाने स्वतंत्र राजकीय भूमिका घेतली .
                               क्रमश :