!!! कंचनी चा महाल !!!
माझ शालेय जीवन मेहकर पासून जवळच ११ कि .मी . असलेल्या सुलतानपूर या गावी गेल . रविवारची सुट्टी आणि मेहकर चा बाजार असल्यामुळे नेहमीच वडिलांसोबत ,मित्रांसोबत येण दर आठवड्याला सुरु असे . तो बहुदा २०
वर्षापूर्वीचा काळ असेल एकदा काही मित्रासोबत सिनेमा पाहण्यासाठी गेलो परंतु दुपारचा शो सुरु होऊन बराच वेळ झाला होता मग आता काय करावे तर आम्ही मेहकर मध्ये हुंदडायला लागलो सायकलवर फिरण्याचा आनंद घेऊ लागलो ,मेहकर शहराच्या थोड बाहेर एक पडकी ऐतिहासिक वास्तू आम्हाला दिसली मला त्याबद्दल कुतूहल निर्माण झाल परंतु ही वास्तू कसली याची माहिती कोणालाच नव्हती .पुढे शहरात शिक्षणासाठी आल्यावर महाविद्यालयीन जीवनात या वस्तूबद्दल मी वर्तमानपत्रातून वाचाल तेंव्हा यावर माझ प्रेम अधिक घट्ट झाल . ती ऐतिहासिक वास्तू म्हणजे " कंचनीचा महाल " साहित्य क्षेत्रातील याच मातीतून जन्मलेल्या ना .घ .देशपांडे यांची कलाकृती साहित्यक्षेत्रात अजरामर झाली ती म्हणजेच कंचनीचा महाल !
ना.घ .देशपांडे यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा २१ ऑगस्ट १९०९ रोजी झाला .बालवयातच कवितेचा छंद ना .घ .देशपांडे यांना लागला होता .पुढे एल .एल .बी .करून देशपांडे यांनी वकिली व्यवसायाला मेहकर सत्र न्यायालयात सुरुवात केली .बी.ए.ला असताना इ.स. १९२९ साली त्यांनी लिहिलेली शीळ ही कविता वर्गमित्र गायक गोविंदराव जोशी (जे पुढे जी.एन. जोशी या नावाने प्रसिद्ध झाले) यांनी कार्यक्रमांमधून गायला सुरुवात केली. ती अतिशय लोकप्रिय झाली. पुढे इ.स. १९३२ साली एच.एम.व्ही.ने ती जी.एन.जोश्यांच्याच आवाजात ध्वनिमुद्रित केली. यातून भावगीत हा प्रकार मराठी संगीतक्षेत्रात रूढ झाला. इ.स. १९५४ साली शीळ याच नावाने त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. इ.स. १९६४ साली अभिसार हा नाघंचा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. त्याला महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक मिळाले. पुढे इ.स. १९८६ साली प्रकाशित झालेल्या ख़ूणगाठी या काव्यसंग्रहास साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
याशिवाय कंचनीचा महाल (चार दीर्घकवितांचा संग्रह) व गुंफण (शीळ काव्यसंग्रहाच्या काळापासून तोवर अप्रकाशित राहिलेल्या कवितांचा संग्रह) यांचाही त्यांच्या ग्रंथसंपदेत समावेश होतो. यापैकी मेहकर बाहेरील जी ऐतिहासिक वास्तू उभी आहे त्याला समर्पित असलेल्या आपल्या भावना ना .घ .नी आपल्या कंचनीचा महाल या दीर्घकाव्य संग्रहात विषद केलेल्या आहेत .
मेहकर जवळील एक पडीक वास्तू जीला कंचनी महाल आपण म्हणतो त्यामागे एक इतिहास म्हणा कि आख्यायिका आहे .यामागे काही भ्रामक जरी असले तरी कंचनी ही एक रूपवान सौदर्यवती लावण्यवती राहिलेली असेल यात शंका नाही .असे म्हणतात .ती अतिशय सुंदर आणि रूपवान होतीच तिला तिच्या रूपाचा अहंकार होता .घुंगरांचे श्रृंगाररसपूर्ण बोल तिथे कायम निनादत असत. अनेक सरदार- सेनापती तिच्या सौंदर्याचे दिवाणे होते. पलीकडे लोणार सरोवराच्या काठी असलेले कमळजा देवीचे देऊळ! तिथे जळणारा नंदादीप ...हे सगळ्या गावाचे श्रद्धास्थान होते. एक सरदार पुत्र तिच्या प्रेमात पडला. तिने आपल्या बरोबर मंदिरात येऊन देवीचे दर्शन घ्यावे अशी त्याची आकांक्षा होती. पण कंचनी पडली आढ्यतेखोर, रुपसंपन्न कलावंतीण. तिला गाव उतरुन पलिकडे जाणे कमीपणाचे वाटले. ती वदती झाली... "मी नाही येणार तिथपर्यंत. माझ्या याच वाड्यात माडीवर माडी बांधून मी देवीचे दर्शन घेईन."... झाले........मजल्यावर मजले चढविण्यासाठी कारागिर राबू लागले आणि एके दिवशी...ती प्रदोष पूजा करायला व देवीचा दिवा पहायला वरती चढली आणि त्यामागील आख्यायिका अशी आहे कि कंचनी तो दिवा पाहते आणि लगेच तिची शिळ होऊन ती खाली कोसळते .याच आख्यायिका आणि कंचनी भोवती फिरणाऱ्या कथेला ना .घ .देशपांडे यांची अतिशय सुंदर काव्य रुपात देऊन साहित्यात अजरामर केले .माझ्या दृष्टीने कदाचित कंचनीचा घातपात झाला असेल ती रूपाने धनवान होतीच परंतु तिचा महाल पाहून ती धनवान असेलच याची खात्री पटते परंतु ना.घ .देशपांडे ने यालाच नवीन आयाम दिला त्या काव्यओळी अशा
" अशीच होती रे निःशब्द मधुर ती रात्र राजसवाणी
असेच खोलात वाहत होते रे या पैनगंगेचे पाणी
सोसून गारठा चंचळ जळाच्या रुपेरी लाटांत न्हाले
आणखी अशी या पश्चिमे कडून चढून वरती आले
गारठ पदर कंपित अधर भरला कलश माथी
जमले होते रे आधीच वरती प्रदोष पूजेचे साथी
अंगाला लंपट झालेले माझे ते विरल वसन ओले
पहात होते रे वरून भाविक आतून कामूक डोळॆ
दूरच्या क्षितीजा वरती होता रे कोवळा ...क्रमश : "
ना.घ .देशपांडे यांची कविता मनाला भुरळ घालून कंचनी बद्दल भुरळ घालतेच परंतु ना.घ .देशपांडे यांचा साहित्यक्षेत्रात ग्रामीण भागातून येऊन वेगळीच वाट निर्माण केली अशी स्तुतीसुमने ना.धो .महानोर सारखे कवी साहित्यिक वाहायला मागे नाही राहिले . आज कंचनीचा महाल ची ओळख करून देणारे ना.घ .देशपांडे आणि तो पडका महाल सरकार ,पुरातत्व विभाग यांच्याकडून दुर्लक्षित आहे .या महालाचा संवर्धन करणे महत्वाचे आहे . तसेच काही काळ नागपूर आकाशवाणीवर कार्यक्रम सल्लागार समितीचे सदस्य होते. त्याकाळी आकाशवाणीवर फक्त पुरुष निवेदक असत. नाघंचे म्हणणे होते की, स्त्रियांच्या आवाजाचा स्वर पुरुषांपेक्षा उंच असल्यामुळे त्यांना निवेदक म्हणून नेमावे.त्यांची ही सूचना केंद्राने मान्य केली, व तेव्हापासून रेडिओवर निवेदिकांना प्रवेश मिळाला. अशा या कृतीशील आणि साहित्यक्षेत्रात आपले योगदान देणाऱ्या ना .घ . चे स्मारक मेहकर परिसरात व्हावे आणि त्यांची प्रेरणा असलेला कंचनीचा महाल वाचवायला हवा .
- प्रविण जाधव

No comments:
Post a Comment